बचत गटाच्या मिटिंगसाठी बाहेर गेल्या होत्या, घरी परतल्यावर धक्काच बसला…
![She had gone out for a self-help group meeting, but when she returned home, she was shocked ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/She-had-gone-out-for-a-self-help-group-meeting-but-when-she-returned-home-she-was-shocked-....png)
रत्नागिरी | जिल्हयात बंद घरे फोडून चोरीच्या घटना अलीकडे वाढत असल्याचं दिसत आहे. असाच प्रकार चिपळुण तालुक्यात मुंढे विकासवाडी येथे घडला असून बंद घरात शिरुन तब्बल २ लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हा सगळा चोरीचा प्रकार ८ एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
चिपळुण परिसरात असे प्रकार गेल्या काही दिवसात वाढले आहेत. दरम्यान याप्रकरणी रत्नागिरी येथून रॅम्बो नावाचे श्वान पथक मागविण्यात आले होते हे श्वान पथक घटना घडली त्या ठिकाणपासून तीनशे मीटर अंतरापर्यंत धावत गेले. यावरून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रत्नागिरी येथून आलेल्या या श्वान पथकाला पर्सचा वास देण्यात आला होता.
असा झाला खुलासा…
राधा राजेश घाग वय ४२ यांनी ही फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामध्ये २ लाख ३२ हजार २१९ रूपयांचे सोन्याचे दागिने सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा हार, सोन्याची कर्नफुले, सांन्याची चैन, अंगठी, सोन्याची माळ इत्यादी तसेच ३२ हजार रुपयांची रोखड घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. घाग हे महावितरणचे कर्मचारी असून ते ऑफिसमध्ये गेले होते. मुलगाही घरी नव्हता फिर्यादी राधा घागही बचत गटाच्या मिटिंगसाठी बाहेर गेल्या होत्या. तास दीड तास त्या मिटिंगमध्ये होत्या. त्यामुळे दुपारी दीड ते तीनच्या सुमारास घर बंद होते हिच संधी साधून ही मोठी चोरी झाली आहे.
राधा घाग घरी आल्यावर त्यांना दरवाजा उघडा दिसला आतील सामान अस्ताव्यस्त होते कपाट उघडे दिसले हा चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना याची खबर दिली. बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून देवघराच्या खोलीतील लोखंडी कपाट उघडून कपाटात ठेवलेली लॉकरची चावी घेवून लॉकर फोडुन हा ऐवज व रोख रक्कम चोरट्यांनी लांबवला आहे. याप्रकरणी अधिक तपास चिपळूण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे करत आहेत.