ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा!

हाऊसिंग सोसायटी फेडरेशचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची मागणी

सोयायट्यांच्या पाणीप्रश्नी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी मनपाला त्यांच्या गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेताना सोसायटीधारकांना ते ‘‘स्वखर्चाने पाणीपुरवठा करतील’’ असे शपथेवर लिहून दिले आहे. मात्र, सोसायटीधारकांना स्वखर्चाने पाणी न पुरवता लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केले जात आहे. अशा बांधकाम व्यावसायिकांवर भारतीय दंड संहिता कलम 200 नुसार फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी चिखली-मोशी-चऱ्होली- पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये आयुक्त दालनात फेडरेशनचे पदाधिकारी आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत दि. ३० ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम व्यावसायिक हे त्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांना भाग पूर्णत्वाचा दाखला घेताना तसेच पूर्णत्वाचा दाखला घेताना हे विकसक सोसायटी धारकांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करतील असे शपथेवर हमीपत्र लिहून देऊन बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेतात. परंतु, त्यानंतर एकही बांधकाम व्यावसायिक सदनिकाधारकांना त्यांच्या स्वखर्चाने पाणी पुरवत नाहीत. उलट सदनिकाधारकांच्या कडून घेतलेल्या आगाऊ देखभाल खर्चातूनच हा खर्च करतात.

हेही वाचा – खुशखबर! पुण्यातील म्हाडाच्या ५ हजार ८६३ घरांसाठी आजपासून अर्जविक्री-स्वीकृती

भारतीय दंड संहिता कलम २०० नुसार जर एखाद्या नागरिकांने किंवा एखाद्या कंपनीच्या समूहाने किंवा एखाद्या व्यावसायिकाने शपथेवर लिहून दिलेल्या हमीपत्राचे उलंघन केले तर हा भारतीय दंड संहिता कलम २०० नुसार गुन्हा आहे.

तसेच, हमीपत्रा व्यतिरिक्त सदनिका धारकाची फसवणूक करण्यासाठी हे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांकडून त्यांच्या करारनाम्यामध्ये सदनिकाधारक विकत घेतल्या जाणाऱ्या पाण्याचा खर्च स्वतः करतील असा कुठलाही उल्लेख करणार नाहीत असे देखील या लिहून घेणाऱ्या हमीपत्र मध्ये स्पष्टपणे उल्लेख करावा आणि नागरिकांची आणि पिंपरी चिंचवड मनपाची होणारी फसवणुकीला आळा घातला पाहिजे. ज्या बांधकाम व्यावसायिक यांनी बांधकाम पूर्णत्वाचे दाखले घेताना स्वतः स्वखर्चाने आम्ही सदनिकाधारकांना पाणीपुरवठा करतील असे हमीपत्र लिहून दिलेले आहे त्यांना हमीपत्रानुसार सोसायटी धारकांना पाणी पुरवण्याचे आदेश दिले पाहिजेत, असेही सांगळे यांनी म्हटले आहे.

शहरातील बहुतेक बांधकाम व्यवसायिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्वखर्चाने पाणीपुरवठा करेल अशा लिहून दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन केलेले आहे. याबाबत आम्ही वारंवार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना अवगत केलेले आहे. तरीदेखील प्रशासनाकडून अशा सर्व बांधकाम व्यवसायिकांना पाठीशी घातले जात आहे .प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून संगणमताने आमची पिळवणूक चालू आहे.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button