‘श्रीकांत शिंदे अजून ‘बच्चा’, यंदा दिल्लीत जाणार नाहीत’; संजय राऊतांचा हल्लाबोल
![Sanjay Raut said that Srikant Shinde will not go to Delhi this year](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut-1-780x470.jpg)
मुंबई | महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मला वाटत नाही की अजून कुठल्या जागेवर मविआत चर्चा चालू असावी. काल आम्ही नक्कीच भेटलो. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी भेटलो. आम्ही मविआच्या एका महत्त्वाच्या बैठकीत बराच वेळ चर्चा केली. परंतु, प्रत्येक बैठकीत जागावाटपावरच चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे. जागावाटपावरील आमच्यातील चर्चा आता संपली आहे. तुम्ही (प्रसारमाध्यमं) जे दावे करत आहात, तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत त्यात तथ्य नाही. आमच्या कालच्या बैठकीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवर बिलकूल चर्चा झाली नाही.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड शहरातील सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत १०० टक्के मतदानाचा निर्धार
भिवंडी लोकसभेबाबतचा निर्णय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायला होता. माझ्या माहितीप्रमाणे भिवंडीची जागा राष्ट्रावादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष लढणार आहे. तुम्ही सांगलीबाबत विचारत असाल तर शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी आमचा उमेदवारच जाहीर केला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आता तुम्ही महायुतीत आहात, तर अजून स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकलेला नाहीत आणि जिंकण्याची भाषा करत आहात. दिल्ली बहुत दूर हैं बच्चू. श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत. आमच्या सामान्य कार्यकर्ता असलेल्या वैशाली दरेकर या गद्दारी आणि अहंकार यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.