एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी महामंडळ सकारात्मक
– परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
मुंबई l प्रतिनिधी
एस.टी. महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेवर निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी एस.टी.महामंडळ सकारात्मक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले.
राज्य परिवहन महामंडळातील निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या वारसांना मागील काही वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळाले नसल्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य मेघना साकोरे बोर्डीकर, राजेश पाटील यांनी उपस्थित केला होता.
त्यावर उत्तर देताना अनिल परब म्हणाले, “राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्तीवेतन योजना 1995 लागू करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयामार्फत करण्यात येते. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून मागील दोन वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 9 हजार 904 एवढी असून त्यांची 175 कोटी रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे.
343 मृत कर्मचाऱ्यांची कामगार करार रक्कम 1 कोटी 53 लाख 66 हजार 886 आणि रजेची थकीत रक्कम 2 कोटी 69 लाख 32 हजार 116 अशी एकूण रक्कम 4 कोटी 22 लाख 99 हजार 2 रुपये इतकी देणी प्रलंबित आहेत.
या थकबाकीची रक्कम निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने देणे सुरु आहे. महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या कर्मचान्यांच्या वारसांना वेळेवर कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी जे दावे संगणकीय प्रणालीवर सादर करता येत नाही असे दावे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्याबाबत अपर केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना विनंती करण्यात आली असल्याचेही मंत्री परब यांनी सांगितले,