रोहित शर्माची नाराज होऊन थेट बीसीसीआयकडे तक्रार
सीरीज दरम्यान रोहितची फलंदाजी आणि त्याचे निर्णय यावर गावस्करांनी सातत्याने टीका केली.
![Rohit Sharma, Angry, Live, ,Complaint, Batsman, decision, Gavaskar,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/rohit--780x470.jpg)
पुणे : कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनामुळे रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. फक्त कॅप्टनशिपच नाही, तो स्वत: खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याच्यावर बरीच टीका सुरु आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याचं प्रदर्शन पाहून अनेक दिग्गजांनी तिखट शब्दात त्याचा समाचार घेतला. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, रोहित शर्माला एका दिग्गजाचे शब्द खूपच जिव्हारी लागले. या बद्दल त्याने बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. रिपोर्ट्नुसार हे महान दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आहेत.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर बीसीसीआयसोबत बैठक झाली. त्यात रोहित शर्माने हा मुद्दा उपस्थित केला, असं क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी गरजेपेक्षा जास्त नकारात्मक वक्तव्य केली असं रोहित मीटिंगमध्ये म्हणाला. बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने क्रिकब्लॉगरने हे वृत्त दिलं आहे. रोहितच्या मते, गावस्कर यांनी इतक्या कठोर शब्दात टीका करायला नको होती. म्हणून त्याने सुनील गावस्कर यांची बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
हेही वाचा – ‘सांगली येथे ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार’; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
गावस्कर काय बोलून गेले?
गावस्कर यांनी काय वक्तव्य केली, ते एकदा जाणून घेऊया. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात खेळणार नसेल, तर संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली पाहिजे असं गावस्कर सीरीज सुरु होण्याआधी म्हणाले होते. रोहितच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. म्हणून त्याने ब्रेक घेतला होता. तो दुसऱ्या कसोटीपासून उपलब्ध होता. सीरीज दरम्यान रोहितची फलंदाजी आणि त्याचे निर्णय यावर गावस्करांनी सातत्याने टीका केली. रोहितची ही शेवटची मालिका असू शकते असं सुद्धा गावस्कर बोलून गेले.
रोहित शर्मा काय म्हणालेला?
सिडनी कसोटीत रोहितने स्वत:ला ड्रॉप करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कसोटीच्या दुसऱ्यादिवशी त्याने एक मुलाखत दिली. त्यात तो म्हणाला की, “लॅपटॉप, पेन घेऊन कोणी काही लिहिलं-बोललं, त्या आधारावर मी निर्णय घेणार नाही” काही दिवसांपूर्वीच वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रोहित शर्मा आणि सुनील गावस्कर एकत्र दिसले होते.