आमदार रोहित पवारांचे जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF प्रशिक्षण केंद्र मंजूर
रोहित पवारांना केंद्राबाहेर अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांचा राडा
![Rohit Pawar, Jamkhed, Kusadgaon, SRPF Training, Centre, Sanctioned,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/rohit-pawar-780x470.jpg)
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी जामखेडच्या कुसडगावमध्ये SRPF प्रशिक्षण केंद्र मंजूर केलं होते. या केंद्राचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आलेला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते या केंद्राचं लोकार्पण आयोजित करण्यात आलेलं होतं. परंतु केंद्राच्या बाहेरच रोहित पवारांना अडवण्यात आलेलं आहे.
रोहित पवारांना केंद्राबाहेर अडवल्याने पवारांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी राडा सुरु केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राम शिंदे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रोहित पवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच अडवल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
जामखेडमध्ये राज्य राखीव पोलिस दलाचं प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आलेलं असून त्याचा लोकार्पण सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. मात्र राज्य राखीव पोलिस दल आणि जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी दिली नाही. या केंद्राचं शंभर टक्के काम झालेलं नाही, असं कारण देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एसआरपीएफ केंद्र मंजूर झाले होते. त्यासाठी तब्बल ३४ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र सरकार बदललं आणि हे केंद्र पुन्हा जळगावच्या वरणगावला हलविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या.
आमदार संजय सावकारे यांचं फडणवीसांना पत्र
एसआरपीएफचं प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथे व्हावं, यासाठी आमदार संजय सावकारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी जळगावच्या वरणगाव येथे हे केंद्र मंजूर झालं होतं, त्यामुळे ते पुन्हा तिथेच व्हावं, अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीसांनी शेरा देत निर्णय स्थगित करुन पुन्हा वरणगाव येथेच केंद्र करण्यात यावे, असं म्हटलं आहे.