रोहित आर्याचा एन्काऊंटर, मुंबई पोलिसांनी घातल्या गोळ्या
रोहित आर्याकडे होती एअर गन
मुंबई : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत साधारण 17 मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करतान पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. यातच त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली होती. मुलांची सुटका केल्यानंतर रोहित आर्या याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता रोहित आर्याचे एन्काऊंटर करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सहा दिवसांपासून पवई येथील आरए स्टुडिओत एका वेब सिरिजसाठी ऑडिशन चालू होते. या ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आले होते. सहा दिवसांपासून ऑडिशनची ही प्रक्रिया चालू होती. सकाळी दहा वाजता मुले ऑडिशनसाठी जायची. त्यानंतर रात्री आठ वाजता मुले स्टुडिओच्या बाहेर पडायची. त्याआधी दुपारी मुलांना जेवण्यासाठी सुट्टी दिली जायची. आज मात्र मुले जेवणासाठी बाहेरच आली नव्हती. त्यानंतर 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. मुलांना डांबून ठेवल्याचे समोर येताच सगळीकडे खळबळ उडाली होती. पोलिसांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या स्टुडिओकडे धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन चालू केले होते.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून राष्ट्रविकासाचा संदेश – दिनेश यादव
रोहित आर्याकडे होती एअर गन
मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्याकडे एक एअर गन होती. सोबतच त्याच्याजवळ काही केमिकल्सही होते. मुलांना डांबून ठेवल्यानंतर त्याने एक व्हिडीओ पाठवला होता. मला काही प्रश्न विचारायचे आहेत, असे तो या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. त्याला कोणत्या विषयावर बोलायचे होते हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. रोहित आर्याने मुलांना जाळून मारण्याची धमकी दिली होती.
एन्काऊंटर कसे करण्यात आले?
पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी आपेल ऑपरेशन चालू केले होते. रोहितसोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यानंतर पोलिसांनी बाथरुमच्या काचा तोडून आत प्रवेश केला. यावेळी पोलीस आणि रोहित आर्या यांच्यात चकमक झाली. याच चकमकीत रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लगेच रुग्णालयात पाठवले. रुग्णालयातच रोहितचा मृत्यू झाला. सध्या सर्व 17 मुले सुखरुप आहेत.




