‘रिपाइंला विधानसभेच्या वीस जागा द्याव्या’; रामदास आठवले यांची मागणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/PUNE-3-780x470.jpg)
सातारा : सातारा ही भीमाई भूमी असून याठिकाणी लवकरच सुमारे ३००- ४०० कोटी रुपये खर्च करून भव्य भीमाई स्मारक होणार आहे. डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोचवायचे माझे मिशन आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रिपाइं पक्ष घेऊन जायचा आहे, असा निर्धार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. महायुतीतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रिपाइं पक्षाकडे लक्ष द्यावे आणि २० जागा विधानसभेला द्याव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त तालीम संघाच्या मैदानावरील सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय नेत्या सीमाताई आठवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे, राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी राज्यमंत्री व राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जीत आठवले उपस्थित होते. आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले. भीमाई स्मारक परिसराच्या आजूबाजूची ३ ते ४ एकर जागा घेण्यात यावी. भीमाई आमचे प्रेरणास्थान आहे. भीमाईची भूमी आहे तशीच छत्रपतीची सातारा राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखं साताऱ्यात आली आहेत.
हेही वाचा – ‘एकाही गद्दारला मी रोजगार देणार नाही’; उद्धव ठाकरे यांचा इशारा
डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी हात लावेल, त्याचा अपमान करेल त्याचा कोथळा मी बाहेर काढेन. अन्यायाविरोधात लढायचे आहे. रिपाइं पक्ष आता वाढवायचा आहे. मी चळवळ देशात वाढवली आहे. माझ्याविरोधात बोलायचे असेल त्यांना बोलू द्या. वेळ आली तर त्याचे पोल खोलुद्या अशी कविता त्यांनी केली. मुस्लिम समाजाने आमच्या सोबत राहिले पाहिजे. मोदी मुस्लिम समाजाबरोबर आहेत. आरक्षण काढणार असे म्हटले तर आम्ही कडू आवलादीचे लोक आहे. बाबांसाठी मरायला आजही तयार आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, जरांगे यांच्यासोबत आहे. माझा पक्ष आहे छोटा, तो काम करत नाही खोटा, असे सांगत त्यांनी शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
ना. शिंदे म्हणाले, साताऱ्यात भाजप- शिवसेना- आरपीआय यांची युती घट्ट आहे. साताऱ्यात रिपाइं बरोबर असल्याने लोकसभेत इतिहास केला आणि खा. उदयनराजे विजयी झाले. अशोक गायकवाड म्हणाले, रिपाइं वर्धापनदिन पक्षाला दिशा देणारा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये गेले. तसेच कटू निर्णय घेत रामदास आठवले भाजपसोबत सत्तेत गेले. त्यामुळे पक्षाला अधोगती आली नाही. विकास साधता आला. दरम्यान, रिपाइंकडून आंबेडकर चळवळीचा नेता कै. किशोर तपासे यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. रामदास आठवले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.