कौशल्य विकास प्रशिक्षणामुळेच समाजाचा खरा विकास शक्य: अजय चारठाणकर
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित 'यशस्वी' संस्थेचा कार्यक्रम उत्साहात
![Skill Development, Training, Society, Development Possible, Ajay Charthankar, Global, Youth Skills Day, 'Successful' Organizations, Program Enthusiasm,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/world-youth-skill-Day-780x470.png)
पिंपरी : समाजाचा खरा शाश्वत विकास हा कौशल्य विकासातूनच होऊ शकतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी व्यक्त केले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘यशस्वी’संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की संपूर्ण जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश अशी आपल्या भारत देशाची आज ओळख बनली आहे जागतिकीकरणाच्या स्पर्धेच्या तीव्र युगात नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत असताना युवा पिढीने करिअर साठी उद्योजकतेचा मार्ग निवडणे गरजेचे आहे उद्योजक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी युवा पिढीने विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराचा मार्ग निवडायला हवा असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून स्वयंरोजगार सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन. कारण नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे बनणे हे निश्चितच अभिमानास्पद आहे. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करून ज्यांना स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्छा आहे असा युवक- युवतींनी पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या वित्तीय सहकार्य करणाऱ्या योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अजय चारठाणकर व रामदास चव्हाण यांच्या हस्ते यावेळी तृणधान्य (मिलेट्स) रेसिपी बुक चे प्रकाशन करण्यात आले. यशस्वी संस्थेच्या हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या तृणधान्यांच्या पंधरा पाककृतींचा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे.या पाककृतींचे प्रदर्शनही यावेळी भरवण्यात आले होते. तसेच यावेळी ‘यशस्वी’ संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटर मधून विविह प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण करून स्वयंरोजगार सुरु केलेल्या व नोकरीची संधी प्राप्त केलेल्या काही विद्यार्थी= विद्यार्थिनींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी केले. सीमा लांबखडे या विद्यार्थिनीने सरस्वती स्तोत्र गायनाने कार्यक्रमाची सुरूवात केली. तर आभार प्रदर्शन ‘यशस्वी’ संस्थेच्या संतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या केंद्र प्रमुख प्राची राऊत यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे सर्व प्रशिक्षक वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.