राणा दाम्पत्याला गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक, सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या- फडणवीस
![राणा दाम्पत्याला गुन्हेगारांपेक्षा वाईट वागणूक, सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या- फडणवीस](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/राणा-दाम्पत्याला-गुन्हेगारांपेक्षा-वाईट-वागणूक-सरकारने-क्रौर्याच्या-सर्व-मर्यादा-ओलांडल्या.jpg)
नागपूर |
एखाद्या गुन्हेगारालाही जशी वागणूक दिली जात नाही, त्याहून वाईट वागणूक राणा दाम्पत्याला देण्यात आल्याचं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचंही ते म्हणाले आहेत.
“नवनीत राणा यांची तब्येत आता स्थिर होत आहे. परंतू एकूणच ज्याप्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगारांनाही जी वागणूक दिली जात नाही. तशाप्रकारची वागणूक राणा दाम्पत्याला देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात संताप व्यक्त केला आहे.
- फडणवीसांकडून नवनीत राणांची विचारपूस
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन खासदार नवनीत राणा यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलारही उपस्थित होते. लीलावतीमध्ये फडणवीसांनी राणा दाम्पत्याशी चर्चा केली. नवनीत राणा यांना १४ दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.