राज ठाकरेंचा आजपासून नाशिक दौरा! निवडणुकीचे फुंकणार रणशिंग
![Raj Thackeray to visit Nashik from today! The election trumpet will be blown](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/raj-thackeray1-1.jpg)
नाशिक – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून संघटनात्मक बळकटीवर भर दिला जात असून, मुंबईच्या धर्तीवर शाखाध्यक्ष केंद्रीभूत मानून १२२ प्रभागांमध्ये नियुक्ती केली जाणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी (ता.२१) प्रारंभाच्या दौऱ्यात यादी निश्चिती केली आहे. बुधवारी (ता.२२) नाशिकमध्ये येणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून यादीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. शाखाध्यक्षांच्या मेळाव्यात यादी जाहीर करून जबाबदारी सोपविली जाणार आहे.
मनसेत अंतर्गत वाद
गेल्या काही दिवसांपासून मनसेत अंतर्गत वाद सुरू असून, वरिष्ठ नेत्यांकडून नव्या नेतृत्वाला संधी दिली जात नसल्याची तक्रार आहे. सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलनासाठी मोठी संधी असताना आंदोलन करू दिले जात नाही. मुंबईतील नेत्यांशी थेट संवाद साधल्यास स्थानिक वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागते अशी तक्रार आहे. त्यातून मनसेत विसंवाद निर्माण झाला असून, राज ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त एकोपा दिसत असला तरी हा वरवरचा संवाद असल्याचे बोलले जात आहे.
चिरंजीव अमित यांना राजकारणाच्या मैदानात उतरविण्यासाठी नाशिकची निवड
पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. मागील पंचवार्षिकमध्ये सत्तेवर असलेल्या मनसेने पुन्हा एकदा सत्ता संपादनाचा निश्चय केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटना बळकटीवर भर दिला आहे. मागील सव्वा चार वर्षे संघटनेकडे ढुंकूनही न पाहिलेल्या राज ठाकरे यांनी दोन महिन्यांपासून नाशिकमध्ये फेऱ्या वाढविताना चिरंजीव अमित यांनादेखील राजकारणाच्या मैदानात उतरविण्यासाठी नाशिकची निवड केली आहे. अमित हेच नाशिकची निवडणूक हाताळणार हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी संघटना बळकटीवर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या धर्तीवर शाखा अध्यक्षाला महत्त्व येणार आहे. गेल्या महिनाभरापासून संवादाच्या माध्यमातून शाखाध्यक्षांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अमित ठाकरे यांचे मंगळवारी हॉटेल एसएसके येथे आगमन झाले. बुधवारी (ता. २२) पक्षाध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून, दोन दिवस ते तळ ठोकून राहतील. अमित ठाकरे यांच्यासमवेत मनसेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, अविनाश जाधव व योगेश परुळेकर आहेत. अमित ठाकरे यांनी १२२ शाखाध्यक्षांची यादी निश्चित केली आहे. राज ठाकरे हे शाखाध्यक्षांच्या अंतिम यादीवर हात फिरवून गुरुवारी (ता. २३) मेळाव्यात नियुक्ती जाहीर करतील.