“जैन समाजाचे सम्मेद शिखर पर्यटनस्थळ म्हणुन घोषित करू नये”; राज ठाकरे

झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा; राज ठाकरेंची मागणी
मुंबई : झारंखंडमधील गिरीहीद जिल्ह्यातील जैन समाजाचे सम्मेद शिखर पर्यटनस्थळ म्हणुन केंद्र शासनाने घोषित केलं आहे. मात्र या निर्णयाचा जैन समाजाकडून जोरदार विरोध केला जातो आहे. या निर्णयाविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. झारखंड सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं ‘सम्मेद शिखरस्थळ’ हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
झारखंडमधील गिरीहीद जिल्ह्यातील पारसनाथ पर्वतावर असलेल्या श्री सम्मेद शिखरस्थळाला इको-सेंसिटिव्ह झोन घोषित केला जावा, अशी शिफारस राज्य सरकारने फेब्रुवारी २०१८ मध्ये केली होती. केंद्र सरकारने २०१९ मध्ये या क्षेत्राला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. त्यानंतर आता झारखंड सरकारकडून हे मंदिर पर्यटन स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पर्यटन स्थळाची घोषणा झाल्यानंतर याठिकाणी एका मद्यपीचा व्हिडिओ व्हायरल झाला. जैन समाजाचे म्हणणे आहे की, पर्यटन स्थळ जाहीर झाल्यामुळे येथील पावित्र्य भंग होईल. ज्यांना जैन धर्माची आस्था नाही, ते लोकदेखील याठिकाणी येतील आणि मंदिराचे पर्यटन स्थळ होऊन जाईल. मंदिराच्या ठिकाणी मांस-मद्य प्राशन केले जाईल, अशी भीती जैन समुदायामध्ये आहे.




