आमदार नितेश राणे यांचे वादग्रस्त विधानप्रकरणी पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन
पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पालिका इमारतीसमोर काळ्या फिती बांधून निषेध
![MLA, Nitesh Rane, Controversy, Legislative Matters, Pune, Municipal Corporation, Employees, Officials, Work Stoppage, Protest,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/nitesh-Rane-Nishedh-780x470.png)
पुणे : पुणे शहरातील कसबा पेठ भागात असलेल्या पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमण हटविण्यात यावे, या मागणीसाठी पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या वतीने महापालिकेसमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या भाजप आमदार आमदार नितेश यांनी वादग्रस्त विधान केले होते. या विधानाच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने काळ्या फिती बांधुन काम बंद आंदोलन केले.
यावेळी बोलताना पुणे महापालिका अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले की, शुक्रवारी पुणे महापालिकेसमोर भाजप नेते नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन पुकारले होते. यावेळी पुणे महापालिका प्रशासन आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बद्दल आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्याच्या निषेधार्थ पुणे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पालिका इमारतीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.
या शहरामध्ये आम्ही अनेक वर्षापासून अधिकारी म्हणून काम करित आहे. एका रात्रीमध्ये शहरात विकास झाला नाही. तर अनेक वर्ष काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर गेले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्ती बद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे. ही आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातील अतिक्रमणाविरोधात भाजप नेते आक्रमक झाले होते. भाजप आमदार महेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाला ४८ तासांमध्ये अतिक्रमण हटविण्याचा अल्टीमेटम दिला. यावेळी आमदार राणे यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. सर्वधर्मसमभावाचा ठेका फक्त हिंदूंनी घेतला नाही. हे हिंदूराष्ट्र आहे त्यामुळे आधी हिंदूचे हित बघितले जाईल मग इतरांना बघितले जाईल असा इशारा त्यांनी दिला. आपण घोडा हत्याराची भाषा करणार नाही आम्ही थेट कापतो, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.