पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सन्मान
![Pune Collector Dr. Rajesh Deshmukh felicitated by President Draupadi Murmu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Pune-Collector-Dr.-Rajesh-Deshmukh-780x470.jpg)
‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
पुणे : पुणे जिल्ह्याने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’ या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राजेश देशमुख यांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. आजचा महत्वाचा दिवस आहे. तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस आज आपण या ठिकाणी साजरा केला आणि सर्व देशामध्ये दहा लाख पेक्षा जास्त ठिकाणी आज आपण साजरा करत आहोत, मी आजच्या मतदार दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रामधील आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामधील ८० लाख मतदारांना शुभेच्छा देतो, त्यांचा अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाचे आम्ही आभार मानतो. पुणे जिल्ह्यामधील आमच्या सर्व टीमने गेल्या दोन वर्षांमध्ये मतदार यादी आणि निवडणुकांच्या संदर्भात घेतलेल्या परिश्रमाची फलश्रुती आज मिळाली आणि आज आमच्या सगळ्या टीमला माझ्या माध्यमातून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे, असं जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र देशमुख म्हणाले.
जिल्ह्यामध्ये मतदार शिक्षण आणि मतदार शिक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अनेक नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या. युवकांचा मतदार नोंदणीतील सहभाग वाढविणे, महिलांची मतदार नोंदणी याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. वंचित घटकांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट ठेवताना तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार, देह विक्री व्यवसायातील महिला यांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित शिबिरांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांना यापूर्वीदेखील जिल्ह्यात पीएम किसान योजनेतील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तर सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना पीएम आवास योजना आणि स्वच्छ भारत अभियानातील चांगल्या कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला होता.