‘यंदाही आषाढी वारी पायी नको’ वाखरी ग्रामस्थांची जाहीर मागणी
![250 palanquins should be allowed to walk for Ashadi Ekadashi, petition filed in Supreme Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/wari-pandharpur_20180582732.jpg)
पंढरपूर – मागील वर्षापेक्षा कोरोनाची सध्याची दुसऱ्या लाटेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आषाढी यात्रेवर आणि पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आले आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाचा पालखी सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करावा.संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पायी आणल्या जाऊ नयेत विनंतीवजा मागणी आलेली पालख्यांचा शेवटचा मुक्काम असणाऱ्या वाखरी ग्रामस्थांनी केली असून तसे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे ,अशी माहिती वाखरीच्या सरपंच कविता पोरे यांनी दिली. दरम्यान,पालखी मार्गांवरील अन्य गावातील नागरिकांचेही असेच मत आहे.
गेल्या वर्षी कोरोनामूळे आषाढी सोहळ्यासह पंढरपूरमध्ये भरणाऱ्या चारही प्रमुख यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. मात्र यंदाही कोरोनाची परिस्थिती फारशी दिलासादायक नसल्याने पायी पालखी सोहळा आता पालखी मार्गावरील गावांना त्रासदायक वाटू लागला आहे. अजूनही जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा देखील पालखी सोहळे बसने आणावेत, पायी वारी नको असे ठाम मत या पालखी मार्गावरील गावागावातून पुढे येऊ लागले आहेत. माळशिरस तालुक्यातील वेळापूर , पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव आणि वाखरी या पालखी मार्गावरील गावातील लोक आजही कोरोनाच्या भयानक दहशतीखाली आहेत. वाखरीमध्ये ८०० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत.अनेकांवर उपचार सुरू आहेत.तर ३५ जणांचा मृत्यु झाला आहे.वेळापूर परिसरात दुसऱ्या लाटेमध्ये ११०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनाग्रस्त झाले आहेत.तर भंडीशेगावमध्ये २७०पेक्षा अधिकजणांना कोरोना लागण झाली आहे.त्यामुळे यंदा पायी वारी अजिबात नको असाच सूर या गावातून निघत आहे.