पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीला ग्रहण
क्रिकेटच्या पटलावर लहानपणापासूनच पृथ्वी शॉचा नावलौकिक
![Prithvi Shaw, cricket, career, eclipse,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/shoro-780x470.jpg)
महाराष्ट्र : पृथ्वी शॉकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून पाहिलं जात होतं. लहानपणापासून त्याने क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवला आहे. पण आता त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला एक प्रकारे ग्रहण लागलं आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्याला टीम इंडियातून डावलण्यात आलं. त्यानंतर आयपीएल मेगा लिलावात स्वत:ची किंमत 75 लाख रुपये ठेवूनही कोणी घेतलं नाही.त्यानंतर सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेतही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही. मुंबईने ही स्पर्धा जिंकली मात्र अंतिम फेरीत त्याने फक्त 10 धावा केल्या. त्यात आता विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे आता पृथ्वी शॉचं क्रिकेट करिअर संपल्यातच जमा आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. असं असताना बऱ्याच कालावधीनंतर क्रिकेटपटू पृथ्वी शॉ व्यक्त झाला आहे. इंस्टास्टोरीवर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट दिली आहे. तसेच साईबाबांना प्रार्थना केली आहे.
“मला सांग देवा, मला अजून काय पहायचे आहे..जर 65 डाव, 126 च्या स्ट्राईक रेटने 55.7 च्या सरासरीने 3399 धावा केल्या तर मी पुरेसा चांगला नाही. पण मी तुझ्यावर विश्वास ठेवीन आणि आशा आहे की लोकांचा माझ्यावर अजूनही विश्वास आहे. कारण मी नक्की परत येईन..ओम साई राम”, अशी इंस्टास्टोरी पृथ्वी शॉने ठेवली आहे. पृथ्वी शॉला आयपीएल लिलावात कोणत्याच फ्रेंचायझीने घेण्यात रूची दाखवली नाही. सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघात पृथ्वी शॉ देखील होता. शॉने नऊ सामन्यांमध्ये 197धावा करत या स्पर्धेत आपली चमक दाखवली. पण यात एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता.
दुसरीकडे, मुंबई संघाची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरने सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धा जिंकल्यानंतर पृथ्वी शॉबाबत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘मला वैयक्तिकरित्या वाटते की तो गॉड गिफ्टेड खेळाडू आहे. एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे जितकी प्रतिभा आहे, ती कोणाकडेही नाही. त्याला त्याच्या कामाची नीतिमत्ता सुधारण्याची गरज आहे.’, असं श्रेयस अय्यर म्हणाला होता.