प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती सन्मान

डोंबिवली : शासकीय सेवेत मागील तीस वर्षाच्या कालावधीत समाजाप्रती जाणीव ठेऊन उल्लेखनीय प्रशासकीय कामे करणाऱ्या आणि मुंबईत मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्यात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि ‘मेट्रो वुमन’ म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना शनिवारी डोंबिवलीत चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘अभिमानमूर्ती’ सन्मान देऊन गौरविण्यात आले.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर लेखिका श्रध्दा कुलकर्णी उपस्थित होत्या. मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो मार्ग उभारणे हे खूप अवघड आणि आव्हानात्मक काम होते. हे काम करण्यासाठी हजारो जणांचे हात लागले. त्यामुळे या सर्वांप्रती आपण हा पुरस्कार स्वीकारत असून, हा त्या गटसमुहाचा सन्मान आहे, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.
आपण काही विशिष्ट काम करतोय. त्यासाठी आपला सन्मान व्हावा असा विचार करून, उद्दिष्ट समोर ठेऊन आपण कधीच प्रशासकीय सेवेत काम केले नाही. जे समोर आले ते समाजहिताचे काम आहे. ते प्रशासकीय नजरेतून आपणास करायचे आहे या विचारातून काम करत गेले. गतीमान नवीन तंत्रज्ञानाने आयुष्याचे अर्थ बदलून टाकलेत. आपण इंग्रजी साहित्याची अभ्यासक. अशा परिस्थितीत बांधकाम, तंत्रज्ञान असे मूलभूत सुविधांच्या कामाचे ज्ञान सोबत नसताना प्रशासकीय कौशल्ये, उत्तम सहकारी मार्गदर्शक, आई, वडील आणि कुटुंबातील इतर घटकांकडून झालेला संस्कार, त्यावेळी मित्र परिवाराने केलेले साहाय्य यामधून आपल्या व्यक्तिमत्वाची घडण झाली. त्यामधून काम करण्याची उर्मी मिळत गेली, असे प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी सांगितले.
हेही वाचा – मावळमधील १० अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द; पण एक अट कायम
सनदी सेवेत आल्यानंतर नवनवीन विषय त्यातून काम करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या. अवघड आव्हानात्मक परिस्थितीवर शांत, सयंमाने, सकारात्मकतेने मात कशी करायची याचे धडे मिळत गेले. प्रशासकीय सेवा करताना समोर आलेला नवीन विषय, भौगोलिक परिस्थिती, समाजमन यांचा बारकाईने अभ्यास करता आला. त्यामधून खूप शिकता आले. या शिकण्यातून प्रशासकीय चौकटीतून समाजहित, विकासाची अनेक कामे करता आली. आपला कामाचा प्रत्येक दिवस ही काम करण्याची, शिकण्याची आपणास नवीन संधी आहे या भावनेतून मी काम करत असते. चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या कामाची दखल घेऊन या सन्मानासाठी निवड केली याबद्दल भिडे यांनी समाधान व्यक्त केले.
‘प्रशासकीय सेवेत उत्तुंग पदावर कार्यरत असताना जमिनीवर पाय रोवून असणाऱ्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांच्या कार्यकौशल्याची, त्यांची बुध्दिमत्ता, काम करण्याची धडक, समर्पित भाव, शिस्तप्रियता गुणांची नव्या तरूण पीढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. या सन्मानासाठी अश्विनी भिडे यांची निवड करून चतुरंग प्रतिष्ठानने एक महिला सनदी अधिकारी अवघड आणि आव्हानात्मक परिस्थितीत प्रशासकीय सेवेत किती दमदारपणे काम करून दाखवून देऊ शकते, हे दाखवून दिले आहे,’ असे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) निंभोरकर यांनी सांगितले.




