टपाल कर्मचाऱ्यांना मिळणार २०० ई-बाईक्स, अमृता फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

मुंबई : महाराष्ट्र टपाल मंडळाने बुधवारी मुंबई जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ) येथे आयोजित केलेल्या बहुआयामी कार्यक्रमात टपाल कर्मचारी आणि टपाल सेविकांसाठी २०० विद्युत बाइकचे अधिकृत अनावरण केले. याच समारंभात १९७१ च्या ऐतिहासिक लोंगेवाला युद्धाचा सन्मान करणाऱ्या विशेष टपाल पाकिटाचे प्रकाशन केले.
जीपीओ येथील त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते जीपीओ येथे टपाल कर्मचारी आणि महिला टपाल कर्मचाऱ्यांना टपाल वितरणासाठी इ-बाइक देण्यात आली. ‘इंडिया पोस्टच्या या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कार्यक्षम तसेच पर्यावरणास अनुकूल सेवा देणे शक्य होणार आहे. इ-बाइकमुळे पर्यावरण रक्षण होत असून शाश्वत विकास काय असतो, हे जीपीओने दाखवून दिले आहे. याद्वारे नवीन भारताची वाटचाल होते आहे’, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले, तसेच महिलांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.
टपाल खात्यात ५० टक्के महिला तर, काही पोस्ट कार्यालयात १०० टक्के महिला आहेत. लोकसेवेत स्त्रियांची संख्या मोठी आहे. टपाल कर्मचारी टपाल पोहचवण्याबरोबरच संस्कृती जोपासत आहेत. देशातील सर्वात जुनी व विश्वासार्ह संस्था म्हणून असलेली टपाल कार्यालयाची प्रतिमा अधिकच बळकट होईल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा –विद्यार्थ्यांना आर.आर.आर. सेंटर संकल्पनेचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह यांनी पारंपरिक पत्र पाठवण्याचे काम कमी झाले आहे. तर, पार्सलचे प्रमाण अनेक पटीने वाढले आहे. त्यामुळे वाढलेल्या पार्सलचा भार कमी करण्यासाठी टपाल कर्मचाऱ्यांना २०० इ-बाइक देण्यात आल्याचे सांगितले. पार्सल वितरणात मोठी वाढ होत असल्याने इ-बाइक सेवेचा मोठा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी मनोज कुमार, सिमरन कौर, रेखा रिझवी हे टपाल विभागाचे वरिष्ठ अधिकारी व मधु रंगनाथन उपस्थित होते. डॉ. मृण्मयी भजक यांनी सुत्रसंचलन केले.
इंडिया पोस्ट हे दशकांपासून शेवटच्या टप्प्यातील वितरणाचा एक विश्वासार्ह आधारस्तंभ आहे. हे आणखी मजबूत करण्यासाठी, महाराष्ट्र टपाल मंडळाने मुंबई प्रदेशात आपल्या यांत्रिकीकृत वितरण उपक्रमांतर्गत २०० विद्युत बाइक तैनात केल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अमृता फडणवीस यांनी जीपीओमध्ये इ-बाइकला हिरवा झेंडा दाखवला. इ-बाइक सक्षम वितरणामुळे कार्यात्मक कार्यक्षमता वाढते, वितरणाचा वेळ कमी होतो आणि वितरण कर्मचाऱ्यांवरील शारीरिक ताण कमी होतो. विद्युत गतिशीलतेकडे वळल्याने शाश्वत, कमी-उत्सर्जन कार्यांना प्रोत्साहन मिळते, तसेच शहरी भागात विश्वसनीय, आधुनिक आणि नागरिक-केंद्रित टपाल सेवांना बळकटी मिळते, असे महाराष्ट्र टपाल मंडळाने सांगितले.




