महिला-केंद्रित ग्रामविकासांतर्गत “दृष्टा” डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्पाचे आयोजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Satara-780x470.jpg)
सातारा | रेडियन्स रिन्यूवेबल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि जी.टी.टी. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खटाव तालुक्यातील मांजरवाडी आणि मोळ गावांमध्ये महिला सक्षमीकरणाचा ‘दृष्टा-डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्प’ राबवला जात आहे. हा प्रकल्प आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल इंडिया उपक्रमांशी संलग्न असून, महिला उद्योजकता विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या प्रकल्पांतर्गत गावातील महिलांसाठी मोफत फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे, ज्याचे स्वागत दोन्ही गावातील सरपंच आणि ग्रामपंचायतींनी उत्साहाने केले आहे.
रेडियन्स रिन्यूवेबल्सने मांजरवाडी आणि मोळ गावांमध्ये २६० मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प सुरू केला आहे. या सौर प्रकल्पासोबतच, महिला सक्षमीकरणासाठी ‘दृष्टा-डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्प’ सुरू करण्यात आला आहे. यामधून गावातील प्रत्येक महिलेला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रकशिक्षित करण्यात येणार आहे. रेडियन्स रिन्यूवेबल्स आणि जी.टी.टी. फाउंडेशनच्या सहकार्याने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
‘दृष्टा – डिजिटल फॅशन डिझाईन प्रकल्पांतर्गत महिलांना ब्लाऊज, ड्रेस, कापडी खेळणी, जॅकेट, बॅग्स अशा विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा व महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांजरवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच, ‘महिला सक्षमीकरण केंद्रित-दृष्टा ग्राम’ या फलकाचे अनावरण मांजरवाडी आणि मोळ गावांमध्ये करण्यात आले आहे.
हेही वाचा – अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा; मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलिस आयुक्तांना निर्देश
या कार्यक्रमाच्या वेळी रेडियन्स रिन्यूवेबल्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीकन्न सांगमेश्वरन, टी. एस. विंडचे कार्यकारी संचालक जयंत ठक्कर, जी.टी.टी. फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी पाटगावकर, मांजरवाडी गावाचे सरपंच संतोष गायकवाड, मोळ गावाचे सरपंच वैभव आवळे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, मनीकन्न सांगमेश्वरन म्हणाले, “लोक, ग्रह आणि लाभ यांचा विचार करून या समुदायातील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी रेडियन्स तत्पर आहे.” मनीकन्न यांनी जी.टी.टी. फाउंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक करत “ही केवळ सहयोगाची सुरुवात असून, पुढील वर्षांमध्ये अनेक प्रकल्पांचे नियोजन केले जाईल” असे संबोधित केले. पल्लवी पाटगावकर यांनी ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि खेड्यांमध्ये सामुदायिक सहभागातून दीर्घकालीन प्रभाव सुनिश्चित करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या लाभार्थी महिलांना त्यांच्या स्वतःच्या बनवलेल्या वस्तू विकून स्वयंरोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे. जी.टी.टी. फाउंडेशन उत्पन्न वाढीसाठी मेळावे आयोजित करण्यास तत्पर आहे, ज्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल. पहिली बॅच पूर्ण केलेल्या महिलांना आता त्यांच्या गावातील इतर महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सहाय्य करण्याची संधी मिळणार आहे. जीटीटी फाऊंडेशनने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजीमधील कापड उत्पादकांनी पुढे येऊन महिलांना ऑर्डर देण्याचे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.