“दीड कोटी महिलांच्या आयुष्यात पहिल्यांदाच पैसा आला”, लाडकी बहीण योजनेवरून चंद्रकांत पाटलांचं विधान

Chandrakant Patil : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास पावणेतीन कोटी महिला लाभ घेतात. आर्थिक दुर्भल घटकांतील महिलांना या योजनेचा लाभ होतो. तर, एकल, परितक्त्या महिलांनाही या योजनेमुळे फायदा झाला आहे. दरम्यान, या योजनेमुळे कोट्यवधी महिलांच्या खात्यात पहिल्यांदाच पैसे जमा होत असल्याचं विधान भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते कोथरूड येथे एका महिलांच्याच कार्यक्रमात बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली. पण मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना का आली नाही? दोन कोटी ४२ लाख बहिणींना दीड हजार रुपये मिळतात. पण त्यातील दीड कोटी महिलांच्या आयुष्यात पहिल्यांदाच पैसा आला. त्यांच्या अकाऊंटला कधी पैसेच आले नव्हते. असं पुरुषांच्या बाबतीत होतं का? म्हणून महिलांसाठी ही योजना आणली.”
कोथरुड मतदारसंघातील महिलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुरू केलेल्या ‘मानसी’ उपक्रमाअंतर्गत त्रैमासिक सस्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा –लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट, अर्जात चूक झाली तर……
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा महिला व बालविकास विभागाने केली. या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न होणे यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८१ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भातील घोषणा एक्सवरून केली.
लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) केले जाणार आहेत. यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी करणार असून त्यांची ई-केवायसी पूर्ण करणार आहेत. यासंदर्भातील सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.




