महात्मा गांधी जयंतीनिमित्त लायन्स क्लबतर्फे वारजे येथील स्मृतिवनात स्वच्छता अभियान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/M-gandhi-Lions-Club-780x470.jpg)
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब इंटरनॅशनल, महाराष्ट्र राज्य वन विभाग, पुणे महानगर पालिकेचा आरोग्य विभाग आणि वनराई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वारजे येथील स्मृतिवनमध्ये स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या अभियानात ‘लायन्स’च्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी,पुना वेस्ट, फ्युचर, विधिज्ञ, मुकुंदनगर, शिवाजीनगर, सुप्रिम, पुणे रिव्हर साईड, मैत्री या क्लबने सहभाग घेतला.
लायन्स क्लब ऑफ इको फ्रेंड्सच्या पुढाकारातून आयोजिलेल्या ऑक्टोबर सेवा सप्ताहांतर्गत हे अभियान राबवले. स्मृतिवन व परिसरातील कचरा, प्लास्टिक संकलित करण्यात आले. लायन रमेश पसारिजा यांनी वारजे येथील सोसायट्यांमध्ये नको असलेल्या गोष्टी-वेस्ट गोळा करण्यासाठी कॕम्पचे आयोजन केले. तसेच आपल्या भवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रसंगी लायन अनिल मंद्रुपकर, लायन सदस्य किशोर मोहोळकर, पुणे महानगर पालिकेचे वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख स्वच्छता अधिकारी श्री कुरकुट साहेब व त्यांचे सहकारी, वनाधिकारी श्रीयुत अशोक गांधींले, आरोग्य विभागाचे सचिन सावंत, ‘वनराई’चे भारत साबळे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या रुपाली मगर यांच्यासह विविध क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनिल मंद्रुपकर म्हणाले, “ऑक्टोबर सेवा सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान, ‘नो व्हेईकल डे’, वनराईमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, ‘प्लॅनेट २०५०’वर मार्गदर्शन, सोसायट्यांमध्ये विविध वस्तूंचे संकलन, सायकल संकलन व दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना देण्यासह कापडी पिशवी वापरण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच उबदार कपड्यांचे संकलन करून गरजूना वाटप केले जाईल. सप्ताहात पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती केली जाणार आहे.”
किशोर मोहोळकर, सचिन सावंत, अशोक गांदिले, मयूर बागूल, प्रतिभा खंडागळे, रोहिणी नागवणकर, भारत साबळे, रुपाली मगर यांनीही पर्यावरण संवर्धन, स्वच्छता याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. लायन कल्याणकुमार गुजराथी यांनी आभार मानले.