ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

आता औरंगाबाद ते पुणे गाठा फक्त सव्वा तासात, वाचा कुठून तयार होणार नवा मार्ग?

औरंगाबाद |  औरंगाबाद ते पुणे द्रुतगती मार्गाची घोषणा करीत या कामासाठी दहा कोटींचा खर्च लागणार असून, रस्ता तयार झाल्यावर अवघ्या सव्वा तासात औरंगाबाद ते पुणे प्रवास शक्य होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात २०२४ पर्यंत २५ हजार कोटींची विविध कामे पूर्ण करू, अशी ग्वाहीदेखील गडकरी यांनी दिली.

जबिंदा लॉन्स येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ औरंगाबाद ते तेलवाडी या ३ हजार ६२ कोटींच्या प्रकल्पाचे तसेच नगरनाका ते केंब्रिज स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण यासह औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदीकरणाचे भूमिपूजन, दौलताबाद ते माळीवाडा, देवगाव रंगारी ते शिऊर यासह अन्य रस्त्यांचे भूमिपूजन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, नारायण कुचे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, विजया रहाटकर उपस्थित होते.

याप्रसंगी गडकरी म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा या विभागाचा मंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग हा १४५ किलोमीटर लांबीचा होता. २०१४ नंतर नवीन ४५० किमी. लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केले. मागील सात वर्षांत ४ हजार ४२२ कोटींची १३ कामे मंजूर झाली असून, त्यापैकी ५ पूर्ण झाली तर ८ प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. औरंगाबाद ते पैठण रस्त्याच्या कामास प्रारंभ झाला याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबाद ते पुणे द्रुतगती मार्गाची घोषणा गडकरी यांनी यावेळी केली. दरम्यान, गडकरी यांनी औरंगाबाद ते जळगाव यांसह अन्य मार्गावर प्रादेशिक विमानसेवा सुरू करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त केली. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पैठण-औरंगाबाद चौपदरी महामार्गाला ‘शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज राष्ट्रीय महामार्ग’ असे नाव देण्याची मागणी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. या मार्गाच्या चौपदारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाप्रसंगी पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी या मागणीचे निवेदन गडकरी यांना दिले.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button