फोटोसेशनसाठी नाही, कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे – मुख्यमंत्री
![Balasaheb had said, I will turn a deaf ear to the government for Konkan; Today, his son wiped the leaves from his mouth ”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/uddhav-thackeray-1.jpg)
रत्नागिरी – ‘तौक्ते’ चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. आज सकाळी रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर ‘आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही’, म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला. तसेच ‘हेलिकॉप्टरमधून नाही तर जमिनीवरून पाहणी करतोय’, असे म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचे आहे ते करणार.’ तसेच ‘वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणे शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही’, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचबरोबर विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ‘हेलिकॉप्टरमधून पाहणी करून तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय’, असे सांगत मोदींवर निशाणा साधला. तसेच ‘मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही’, असेही ते म्हणाले. यासह ‘पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही’, असा विश्वास व्यक्त करत ‘वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी’, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे, गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवले होते.पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला. सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतो. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे, हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील केल्यानंतर मागील अनुभवातून आपल्याला शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील.’ तसेच लसपुरवठा अद्यापही सुरळीत होत नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.