ना मशिदींचा भोंगा वाजला, ना हनुमान चालीसेचा… अनेक ठिकाणी आजची पहाट भोंग्याविना
![ना मशिदींचा भोंगा वाजला, ना हनुमान चालीसेचा... अनेक ठिकाणी आजची पहाट भोंग्याविना](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/ना-मशिदींचा-भोंगा-वाजला-ना-हनुमान-चालीसेचा-अनेक-ठिकाणी-आजची.jpg)
मुंबई |
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात अत्यंत आक्रमक भूमिका घेत भोंगे खाली उतरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला आज म्हणजेच ४ मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. राज ठाकरे यांनी काल ट्विट करून पुन्हा एकदा आंदोलनावर ठाम असल्याचे जाहीर केले. त्यांनी केवळ मनसे कार्यकर्ते नव्हे, तर देशभरातील हिंदुंना उद्देशून हे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यात बुधवारची पहाट नेमकी कशी होणार याबाबत सर्वांचा चिंता होती.
४ मे रोजीच्या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray)अल्टिमेटमनंतर मंगळवारी रात्रीपासूनच राज्यभरातील पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले होते. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास सुरूवात केली होती. अनेक कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले होते. त्यामुळे आज काय होणार, भोंगा वाजणार, की हनुमान चालीसा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, ना भोंगा वाजला नाही हनुमान चालीसा, अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण शांत असल्याचं चित्र आहे.
- कल्याणमध्ये पहिली अजान भोंग्याविना
कल्याण परिसरातील मशिदींमध्ये आज पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. पोलीस यंत्रणेकडून नागरिक तसेच मनसे कार्यकर्त्यांना शहरात कायदा-सुव्यवस्था राखावी आणि शांतता पाळावी असं आवाहन करण्यात आले आहे.
- कोल्हापुरात सर्व मर्यादा पाळून अजान
कोल्हापूर शहरात आज सर्व मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळून स्पीकरवर अजान झाली. त्यांच्या अजानवर कोणाही विरोध केला नाही. कोल्हापुरात सर्व वातावरण अत्यंत शांत आहे. कोल्हापूर शहर चाळीसहून अधिक आणि जिल्ह्यात चारशेहून अधिक मशिदींमध्ये अजान शांततेत झाली. सर्व मशिदींनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाचे बंधन पाळून अजान पठण केले.
- पुण्यात पहाटेची अजान शांततेत पार पडली
पुण्यात पहाटेची अजान शांततेत पार पडली. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये त्याचबरोबर शहरातील सर्व मशिदींबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठेही मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान लावली नाही. लोकांनी शांतता राखावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हणे यांनी केले आहे.
- नगरमध्ये पहाटेची अजान भोंग्याविनाच, सकाळी हनुमान चालीसा वाजली
अहमदनगरमध्ये पहाटे साडेपाच वाजताची अजान भोंग्याविनाच देण्यात आली. गेल्या काही काळापासून नगर शहरातील विविध मंदिरात सकाळी आणि सायंकाळी हनुमान चालीसा लावण्यात येते. ती मात्र नेहमीप्रमाणे सुरू आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, रात्रीच पोलिसांसोबत मशिदींच्या मौलानांची बैठक झाली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे निश्चित करण्यात आले.