नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक टाळण्यात मात्र यश, उच्च न्यायालयात धाव
![नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक टाळण्यात मात्र यश, उच्च न्यायालयात धाव](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/nitesh-rane-3-1.jpg)
सावंतवाडी |
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश आर. व्ही. रोटे यांनी मंगळवारी फेटाळला़ मात्र, उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून नाटय़मय घडामोडींनंतर अटक टाळण्यात नितेश हे यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, याचिकेवरील सुनावणीबाबत बुधवारी निर्णय अपेक्षित आह़े.
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी आमदार नितेश यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. मात्र, याबाबतचा त्यांचा अर्ज फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने कारवाईपासून दहा दिवस संरक्षण दिले. तसेच त्यांना या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी रितसर अर्ज करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रसिद्ध फौजदारी वकील सतीश मानेशिंदे यांच्यासह मंगळवारी ते येथील न्यायालयात हजर झाले. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ बंधू निलेश राणे आणि अन्य समर्थकही होते. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र, पुढील कारवाईबाबत काहीही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे या निर्णयाविरोधात दाद मागावयाची असल्याचे कारण सांगून नितेश यांचे वकील त्यांना न्यायालयातून बाहेर घेऊन जाऊ लागले असता पोलिसांनी त्यांची गाडी अडवली.
नितेश यांच्याविरोधात कारवाईसाठी सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांची मुदत दिली असल्याने पोलीस त्यांना ताब्यात घेऊ शकत नाहीत, असा नितेश यांच्या वकिलांचा युक्तिवाद होता. तसे करणे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ठरेल, असाही दावा त्यांनी केला. पण सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या म्हणण्यानुसार नितेश यांना न्यायालयाने दिलेले संरक्षण हे त्यांच्या अर्जावर सक्षम न्यायालय निर्णय देईपर्यंतच मर्यादित होते. सत्र न्यायालयाने मंगळवारी निर्णय दिला असल्यामुळे आता ते संरक्षण राहिलेले नाही. सत्र न्यायालयाने याबाबत स्पष्ट निर्देश न देणे म्हणजे मागील दाराने जामीन मंजूर करण्यासारखे आहे, अशी तिखट प्रतिक्रियाही घरत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नोंदवली. दरम्यान, नितेश यांची गाडी अडवल्यामुळे त्यांचे बंधू माजी खासदार निलेश यांनीही आक्रमक होत पोलिसांशी हुज्जत घातली. अखेर सर्वोच्च न्यायालयाचा रोष ओढवून घेण्याच्या भितीपोटी पोलिसांनी नमती भूमिका घेत आमदार नितेश राणे यांच्यासह सर्वाना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
- राकेश परबला पोलीस कोठडी
आमदार नितेश यांचा स्वीय सहाय्यक राकेश परब या प्रकरणी सोमवारी पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मंगळवारी कणकवली येथील सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.