चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात ८०० मेगावॉटचा नवा संच; कोळशाची बचत अन् वीज उत्पादन वाढणार

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रात ८०० मेगावॉटचा संच प्रस्तावित आहे. सुपर क्रिटीकल अथवा अल्ट्रा सुपर क्रिटीकल हा संच राहणार आहे. अशा तंत्रज्ञानातून विकसित केलेला हा राज्यातील एकमेव संच राहणार आहे. त्यामुळे यात कोळशाचा वापर कमी होणार आहे. तसेच २१० मेगावॉटच्या ३ व ४ क्रमांकाच्या संचाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी ‘आरएनएम’ करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती वीज केंद्राचे मुख्य अभियंता अनिल काथोये यांनी दिली.
महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंतापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर काथोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी २९२० मेगावॉट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात भविष्यातील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. राज्यातील औष्णिक वीज केंद्राला महाऔष्णिक शब्द लागणारे चंद्रपूर एकमेव वीज केंद्र आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा – RR vs RCB : राजस्थान रॉयल्स विजयी चौकारासाठी सज्ज, आरसीबीसमोर यजमानांना रोखण्याचं आव्हान, कोण जिंकणार?
पुढे बोलताना काथोडे म्हणाले, उन्हाळ्याच्या दिवसात राज्यात सर्वाधिक वीजेची मागणी याच केंद्राकडून होते आणि ही मागणी शंभर टक्के क्षमतेने आम्ही पूर्ण करतो. आज या वीज केंद्राची क्षमता २९२० मेगावॉट आहे. भविष्यात ८०० मेगावॉटचा नविन संच येथे प्रस्तावित आहे. हा संच अतिशय आधुनिक पध्दतीने विकसीत केला जाणार आहे. सुपर क्रिटीकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटीकल प्रणालीचा हा संच प्रस्तावित राहणार असून कोळशाचा कमी वापर होणार आहे. आज वीज केंद्रात ५ लाख मेट्रीक टन कोळसा उपलब्ध आहे. सध्या कोळशाची कुठलीही टंचाई नसली, तरी भविष्यासाठी कोळसा साठा अधिक वाढविण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदूषणाबाबत वीज केंद्राकडे बोट दाखवण्यात येत असले, तरी वीज केंद्रातून प्रदूषण होत नसल्याचे सांगतानाच इरई नदी खोलीकरणात वीज केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी वीज केंद्राचे अधिकारी राजुरकर, अभियंता बनकर तथा इतर अधिकारी उपस्थित होते.





