‘भाजपा आणि ड्रग्ज पेडलरच्या नात्यांबद्दल बोलूयात’ म्हणत नवाब मलिकांनी शेअर केला अमृता फडणवीसांचा फोटो
![Nawab Malik shares photo of Amrita Fadnavis saying 'let's talk about BJP-drug peddler relationship'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/amruta-fadanvis.jpg)
मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवरुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटोत असणारी व्यक्त ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. “चलो आज भाजपा और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है,” अशा कॅप्शनसहीत हा फोटो नवाब मलिक यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आलाय.
चलो आज BJP और ड्रग्स पेडलर के रिश्तों पे चर्चा करते है pic.twitter.com/FVjbOQ8jvf
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
अन्य एका ट्विटमध्ये या व्यक्तीचं नाव जयदीप राणा असं असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिलीय. फोटोमध्ये अमृता यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती जयदीप राणा असून या व्यक्तीला जून २०२१ मध्ये एनसीबीने अटक केल्याचं सांगितलं जात आहे. ही व्यक्ती सध्या तुरुंगामध्ये असल्याचा दावा केला जातोय. नवाब मलिक यांनी या ट्विटनंतर आपण थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मलिक आणखीन काही खुलासा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलिक यांनी यापूर्वीही भाजपाच्या काही नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप केले होते. मात्र यावेळेस त्यांनी थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा फोटो शेअर करत खळबळ उडवून दिलीय.
Jaideep Rana https://t.co/3GccIpONI2
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021