ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुलींच्या वैद्यकीय अहवालाबाबत रुग्णालयाचा निष्काळजीपणा

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाचे शासकीय मध्यवर्ती रुग्णालयावर ताशेरे

बदलापूर : बदलापुरच्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची सखोल चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रूग्णालयाच्या निष्काळजी व्यवहारावर परखड शब्दांत कानउघाडणी केली. तसेच रूग्णालय व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. पिडीत चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी तीन दिवस रूग्णालयात बोलावण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने शनिवारी मुंबईच्या सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत संबंधित डॉक्टरांना धारेवर धरल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. लहानग्यांच्या अत्याचाराबाबत रुग्णालयाचे डॉक्टर इतके असंवेदनशील कसे वागू शकतात, मुलींच्या वैद्यकीय अहवालाबाबत रुग्णालयाने निष्काळजीपणा का केला, असे सवालही आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी उपस्थित केले.

बदलापूर येथील आदर्श शाळेतील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या अधिक चौकशी आणि तपासणीसाठी राष्ट्रीय बालहक्क आयोगाचा तीन दिवस दौरा होता. या दरम्यान आयोगाच्या सदस्यांनी शुक्रवारी शाळेला भेट देऊन पाहणी केली होती. तसेच शाळा व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, जिल्हा महिला बालविकास विभाग यांच्यासमवेत बदलापूर पालिका मुख्यालयात आढवा बैठक घेतली. यावेळी आयोगाच्या सदस्य सचिव रुपाली बॅनर्जी यांनी पोलिसांच्या दिरांगाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा प्रकार कोणा संबंधितांना वाचविण्यासाठी करत आहात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

लहान मुलांच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात शाळा व्यवस्थापनवर उशिराने का गुन्हा दाखल केला, असा सवालही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केला. याचाच आढावा घेण्यासाठी सह्याद्री या शासकीय अतिथीगृहावर शनिवारी विशेष बैठक पार पडली. यावेळी या प्रकरणात दिरंगाई बाळगलेल्या उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे अधिक्षक यांच्या कारभाराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी जिल्हा महिला बालविकास विभागाचे सदस्यही उपस्थित होते. आयोगाने उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या अक्षम्य कारभारावर ताशेरे ओढले. लहान मुलीच्या तपासणीसाठी मुलीसह पालकांची झालेली फरफट आणि दिरंगाई बाबत कारवाईचे संकेतही आयोगाने दिले आहेत. रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची बाब अधीक्षकांनी राज्य सरकारला कळवली होती का, असा प्रश्न बॅनर्जी यांनी उपस्थित केल्याचे कळते आहे. या दोन्ही चिमुकल्यांच्या वैद्यकीय अहवालातील दिरंगाईसाठी संपूर्णपणे रुग्णालय प्रशासन आणि त्यावेळी कार्यरत असलेले डॉक्टरच कारणीभूत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
अत्याचार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना जिल्हा महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून आणि मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी ३ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आदेश देण्यात आले आहेत. सोबतच कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन आणि सुरक्षित भविष्यासाठी दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी २० लाखांहून अधिक अर्थसहाय देण्यासाठी प्रयत्नशील रहावे, अशा सूचना यावेळी बॅनर्जी यांनी दिल्या आहेत. तसेच दोन्ही पीडित बालक आणि पालकांच्या मानसिक आधारासाठी स्वतंत्र मानसोपचार तज्ज्ञांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

शाळेची घंटा वाजली
आदर्श शाळेची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडीत यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारपासून प्रशासकांनी शाळा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून शनिवारी इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासक सल्लागार विश्वनाथ पाटील यांनी दिली आहे. लवकरच संपूर्ण शाळा पूर्ववत करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button