ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नारायण राणे यांना कोकणासह महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही : जरांगे पाटील

आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड

संभाजीनगर : भाजपचे खासदार नारायण राणे यांना मी धमकी दिली नाही. मराठवाड्यात येऊ नका असेही म्हणालो नाही. तरीही ते म्हणतात की, जरांगे काय करणार ते बघतो! त्यावर तुम्ही काय माझे बघणार? असा सवाल करून, मी बघायला लागलो तर तुम्हाला कोकणासह महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना दिला. फडणवीसांनी मराठ्यांना माझ्या अंगावर घातले तर त्यांची एकही जागा येऊ देणार नाही, असेही आंतरवाली सराटीत पत्रकारांशी बोलताना जरांगे म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यावरून जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर बोलू नये, मी मराठवाड्यात जाणार तेव्हा जरांगे काय करतो ते बघतो, असे नारायण राणे म्हणाले होते. यावर बोलताना जरांगे यांनी नारायण राणे यांना चांगलेच फटकारले. राणेंना बोलायला लागलो तर मागे सरकणार नाही. विनाकारण मला डिवचू नका. माझ्या नादाला लागू नका. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना माझ्या अंगावर घातले तर त्यांची एकही जागा येऊ देणार नाही, असेही त्यांनी सुनावले.

विधानसभेची तयारी सुरू
विधानसभेच्या 288 जागांविषयी जरांगे म्हणाले की, आमचीही तयारी सुरू आहे. 29 ऑगस्टपर्यंत काहीच बोलणार नाही. 29 ला निर्णय झाल्यास राखीव जागाही लढणार. तिथे राखीवच लढतील. एका मतदारसंघातून एकच उमेदवार लढेल. उमेदवार ठरला की बाकीच्यांनी त्याच्या मागे राहण्याची तयारी ठेवा. जे उमेदवार असतील त्यांनी कागदपत्रे काढून आधीच तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंबेडकरांना उत्तर देणार नाही
प्रकाश आंबेडकर जे कुणबी नोंदीच्या विरोधात बोलत आहेत. हरकत नाही, मी मात्र ओबीसीतूनच आरक्षण घेणार. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांना मी कधीच उत्तर दिले नाही, पुढेही देणार नाही. ते नवीन काय काढायला लागले मला माहीत नाही. पण गोरगरिबांचे कल्याण होईल असेच पाऊल मी उचलतो, असे जरांगे म्हणाले.

फडणवीसांच्या विरोधाने आंदोलनाला बळ
राम कदम यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, अभियानात लोक त्यांना चांगले मानतात. त्यांनी फुकट यांच्यात उडी घेऊ नये. तुमच्या नेत्याने किती वेळा आरक्षण देऊन घालवले हे सांगू नये. हे मला उचकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मी उचकणार नाही. आरक्षण आंदोलन सुरूच आहे. आता राजकारणाचे आंदोलन देखील खेळणार आहे. फडणवीस यांनी दरेकर यांच्या माध्यमातून आमच्या विरोधात आंदोलन सुरू केल्याने आमच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले आहे.

मतासाठी आल्यास ‘आरक्षण देतोस का’ विचारा
निवडणूक लढवताना आपण अपक्षच बरे. आघाड्या, पक्ष नको. आघाड्या म्हणजे दुकान असून, मराठ्यांची शान राहिली पाहिजे असे मतदान करा. आमदार मतदान मागायला आले की त्यांना सर्व गॅझेटबाबत प्रश्न विचारा. ‘ओबीसीतून आरक्षण देतोस का’ असेही विचारा. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्याने ओबीसी मतदान फुटते असे सांगणार्‍या आमदारांना मतदान करू नका. नेत्यांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा मुलांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button