राजकारणातील ‘मुन्नाभाई’ अन् नोटांचे राजकारण!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/Politics-780x460.png)
राजकारणातील ‘मुन्नाभाई’ अन् नोटांचे राजकारण!
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
सध्या राज्यासह देशातील राजकीय वातावरण पाहता ‘दमलेल्या बाबांची कहाणी’मधील शाहीर नंदेश उमप यांचे गाणे आठवते. ‘कुणी बी उठतंय काही बी बोलतंय; कसं बी वागतंय चाललंय काय?…’ असे हे गाणे आहे. एखाद्याने विषय काढताच, तोच विषय वेगवेगळ्या प्रकारे मांडला जात आहे, हेच चित्र सर्वत्र आहे. महाराष्ट्रातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचलेले असतानाच नोटांवरील फोटोवरून राजकारण रंगले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. यामुळे सुख-समृद्धी प्राप्त होईल आणि संपर्ण देशाला त्यांचा आशीर्वाद लाभेल, असा तर्क मांडला होता. यावरून भाजपा आणि काँग्रेसने केजरीवालांवर काल टीका केली. आज मात्र यावरून वेगळेच राजकारण रंगल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असावा, अशी मागणी केली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनी छपत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरण्याची मागणी केली आहे. तर, काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबे़डकर यांचा फोटो चलनी नोटांवर छापण्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रासाठी आग्रही आहेत. भाजपाचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करत स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, याही पुढे जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो लावावा, अशी मागणी केली आहे. चार वर्षांपूर्वी भाजपा नेते अवधूत वाघ यांनी ‘पंतप्रधान मोदी हे विष्णूचे अकरावा अवतार असल्याचा दावा केला होता!
देशात अर्थव्यवस्थेची गती, महागाई, अतिवृष्टी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे प्रश्न एकीकडे आहेत. शिवाय, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरू असताना चलनी नोटांवर कोणाचा फोटो लावावा, यावर किस पाडला जात आहे. त्यातही देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तर रुपयाच्या घसरणीवर नवीनच मुद्दा उपस्थित केला आहे. रुपया घसरत आहे अशा दृष्टीने मी पाहत नाही. मात्र, डॉलरची किंमत मजबूत होत आहे, अशा अर्थाने मी रुपयाच्या घसरणीकडे पाहते. डॉलर वधारल्याने त्यांच्या तुलनेत कमी असलेल्या चलनात घसरण होणार. इतर देशांच्या तुलनेत भारतीय चलन चांगली कामगिरी करत आहे, असे मत त्यांनी गेल्या आठवड्यात मांडले.
चलनी नोटेवरील महात्मा गांधी यांच्या फोटोला पर्याय दिले जात आहेत. याच गांधी विचारांची महती सांगणाऱ्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात एक डायलॉग आहे. ‘जितना टाइम बापू अंदर रहा ना, उतनाही उनका इज्जत बढा, क्योंकी वह राइट था… हम भी राइट काम करके आठ-दस बार अंदर आयेंगे तो, अपना भी पुतला लगेगा पार्क में, अपना फोटो होगा हर नोट पर…’
प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्याप्रमाणेच सांगायचे झाले तर, आपला फोटो वापरा असे हे नेते सांगत नाहीत, हेच आपले सुदैव. राजकारणातील मुन्नाभाई सध्या तरी वेगवेगळी नावे सुचवत आहेत, एवढेच काय ते समाधान.