मुकेश अंबानींनी घेतली वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, मध्यरात्रीच्या भेटीत काय ठरलं?
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती आणि राजकारण्यांच्या भेटींना उत आला आहे. २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता काल मध्यरात्री रिलायन्स उद्योगाचे मुकेश अंबांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही. परंतु, उद्योगपती आणि नेतेमंडळी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. दुपारी जवळपास तासभर या उभयंतांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, यांच्या भेटीत नक्की कोणत्या विषयावर चर्चा झाली हे कळू शकले नाही. तसंच, काल रात्री उशीरा मुकेश अंबांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुकेश अंबांनी यांचे पूत्र अनंत अंबांनीसुद्धा उपस्थित होते. या तिघांमध्येही दीर्घकाळ चर्चा झाली. त्यानंतर, मध्यरात्री वर्षा बंगल्यावरून मुकेश आणि अनंत अंबांनी बाहेर पडले. यांच्या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मात्र, मध्यरात्री झालेल्या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नेते-उद्योगपती यांच्या भेटींमुळे राज्याच्या राजकारणात आता आणखी काही नवीन शिजतंय का असाही प्रश्न विचारला जात आहे. दोन आघाडीचे उद्योगपती प्रतिस्पर्धी राजकीय पक्षातील नेत्यांना भेटतात यामागे काहीतरी योजना असेल, अशी शंका उपस्थित केली जातेय. तसंच, हे दोन्ही उद्योगपती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत जवळचे मित्र असल्याने राजकारणात आता नवा अध्याय पाहायला मिळणार आहे का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.