पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत आव्हाडांनी साधला मोदींवर निशाणा, म्हणाले “त्याने कधीच भविष्यवाणी…”
![Modi tweeted a video of the parrot targeting Modi, saying "he never prophesied".](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Jitendra-Awhad-Narendra-Modi-1.jpg)
नवी दिल्ली |
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून राजकीय पक्षांकडून तयारी सुरुवात झाली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल आणि भाजपचे आणखी काही आमदार पक्षातून बाहेर पडतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. जनमत विरोधात जात असल्यानेच भाजपचे आमदार पक्षाला रामराम ठोकत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केलं.
- छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे – चंद्रकांत पाटील
दरम्यान शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील भाजपा नेते नाराजी जाहीर करत टीका करत आहेत. “ज्योतिष, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे. “या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष अवगत असेल तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील? याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी,” असंही ते म्हणाले.
ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे @PawarSpeaks आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खा.@rautsanjay61 भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
यादरम्यान आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी पोपटाला आपल्या हातावर घेण्याचा प्रयत्न करत असताना तो मात्र येत नसल्याचं दिसत आहे. तेथील कर्मचाऱ्याने प्रयत्न करुनही तो पोपट मोदींकडे जात नाही.
“उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती,” असं आव्हाडांनी व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील बहुजन समाजाचे भाजपा आमदार काय करणार याची भविष्यवाणी या पोपटाने कधीच केली होती 😄. pic.twitter.com/V6k584cvUK
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2022