“मंत्रालय बंद, दुकानदारी सुरू”, पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला!
![“मंत्रालय बंद, दुकानदारी सुरू”, पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला खोचक टोला!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/UDDHAV-2.jpg)
मुंबई |
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. “वीजबिल वसुली बंद करा म्हटलं, तर वीज बंद केली. वैधानिक विकास महामंडळं बंद केली आहेत. आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजना बंद केल्या. या सरकारमध्ये सर्व योजना बंद होत आहेत, पण भ्रष्टाचार जोरात सुरू आहे. मंत्रालयं बंद राहात आहेत, पण दुकानदारी जोरात सुरू आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच इतरही अनेक मुद्द्यांवरून पंकजा मुंडेंनी निशाणा साधला आहे.
- “लोकांना आता अपेक्षा राहिल्या नाहीत”
“एखाद्या मंत्रालयात मुख्यमंत्रीपद, त्याखालोखाल गृहमंत्रीपद महत्त्वाचं आहे. पण राज्यातले मंत्री स्वत:च भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असतील, तर जनतेनं कुणाकडे बघायचं. कुणाकडून अपेक्षा ठेवायची. या सरकारकडून लोकांना आता अपेक्षा राहिल्या नाहीत. येणाऱ्या निवडणुकीत लोक सरकारला इंगा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत”, असं त्या म्हणाल्या.
- “सरकारच्या विलंबामुळे संप चिघळला!”
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा सध्या गाजत आहे. या मुद्द्यावरून देखील पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला सुनावलं आहे. “एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळलेला आहे. एखाद्या संघटनेच्या सगळ्या मागण्या मान्य करता येत नाहीत. पण त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. सरकारने चर्चेसाठी विलंब केल्यामुळे हा संप चिघळला”, असं त्या म्हणाल्या.
- “आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही”
“ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे. अध्यादेशाप्रमाणे मिळायला हवं आणि तो अध्यादेश टिकला देखील पाहिजे. त्याविरोधात जर कुणी न्यायालयात गेलं असेल, तर त्याबाबत सरकारने आपली भूमिका ठामपणे मांडायला हवी. त्यामुळे अध्यादेशावरची टांगती तलवार बाजूला होईल. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही, यावर आम्ही ठाम आहोत”, अशी भूमिका यावेळी पंकजा मुंडे यांनी मांडली.