हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप, पांगरा शिंदे भूकंपाचे केंद्र बिंदू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आज मंगळवारी सकाळी पाच वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला असून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचे केंद्र आहे. पांगरा शिंदे पासून जवळपास दहा किलोमीटर पर्यंत भूकंपाचा हादरा जाणवला आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत कळमनुरी या भागातील अनेक गावांमध्ये काही वर्षापासून भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि अजूनही ही मालिका सुरूच आहे भूगर्भातून आवाज येण्याच्या घटना नेहमीच घडतात त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान, आज मंगळवारी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला असून याची 3.5 रिश्टर स्केलवर नोंद झाली आहे.
तालुक्यातील पांगरा शिंदे हे गाव भूकंपाचे केंद्रबिंदू असून या परिसरापासून जवळपास दहा किलो मीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणवला. विशेष म्हणजे मागील दोन-तीन दिवसांपासून जिल्हाभरात पुन्हा एकदा गारठा जाणवत जाणवत आहे.
हेही वाचा – पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला! पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय म्हणाले?
भूकंपाचा धक्का जाणवला त्यावेळेस पांगरा शिंदे गावासह आजूबाजूचे नागरिक गुलाबी थंडीच्या साखर झोपेत होते. जमीनीतून हादरा जाणवत घरांच्या खिडक्यासह टीनपत्रे, सामानांचा आवाज झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय भूंकपमापक केंद्रामध्ये 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे
दहा किलोमीटर पर्यंत या भूकंपाचा हादरा
दरम्यान, पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, नांदापूर, बोल्डावाडी, रामेश्वरतांडा, दांडेगाव, कोपरवाडी, बोथी, सालापूर, डिग्रस बुद्रूक, पिंपळदरी, राजदरी, सिंदगी, सोनवाडी यासह परिसरातील काही गावांमधून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे कुठेही जिवीत व वित्त हानी झाली नाही. वारंवार होणाऱ्या भूकंप व जमिनीतील आवाजामुळे परिसरातील गावकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान या भूकंपामुळे कुठेही आपत्ती झाली नसली तरी परिसरातील गावांमधून पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.




