पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला! पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता; नेमकं काय म्हणाले?

PM Modi On Vladimir Putin Residence Drone Attack: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नोव्हागोराड येथील निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. युक्रेनने ९१ लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष अजून भडकण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर जागभरातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
“रशियन फेडरेशनच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तामुळे खूप चिंतेत आहे. संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या सुरू असलेले राजनैतिक प्रयत्न हाच सर्वात यशस्वी होईल असा मार्ग आहे. आम्ही संबंधित सर्वांना या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि त्या प्रयत्नांना नुकसान पोहोचवणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन करतो,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
हेही वाचा – देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक विहीर पूर्ण
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोाल्ड ट्रम्प यांनी देखील पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने हल्ला केल्याच्या विषयावर भाष्य केलं आहे. ट्रम्प म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे का? मला याबद्दल कोणी सांगितलं? पुतिन यांनी सकाळीच मला सांगितलं की यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला. पण हे चांगलं नाही. मला खूप राग आला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरोप केला की, २८ आणि २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा युक्रेनने मॉस्कोच्या नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या निवासस्थानावर लांब पल्ल्याच्या ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ९१ ड्रोन होते. मात्र, हे सर्व रशियन हवाई संरक्षण दलांनी रोखले.
मात्र लावरोव्ह यांनी केलेला हा आरोप युक्रेनने फेटाळून लावला आहे. ‘रशियाचा आणखी एक खोटेपणा’, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.




