मराठी कलाकारांनीही बदलापूर येथे घडलेल्या दुर्घटनेवर संताप व्यक्त केला
"हाल हाल करून मारा"; बदलापूर अत्याचार प्रकरणावर मराठी कलाकारांची मागणी
महाराष्ट्र : कोलकाता बलात्कार प्रकरणातून देश अजून सावरला नसताना बदलापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसला आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर सफाई कर्मचारी असलेल्या नराधमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना उघडकीस येताच संपूर्ण बदलापूरकर एकवटले असून त्यांनी आज सकाळपासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. या घटनेचे पडसाद मराठी सिनेविश्वावरही उमटले.
कलाकार झाले व्यक्त
बदलापूर प्रकरणाची बातमी सगळीकडे व्हायरल होताच मराठी कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त लिहीत त्यांचा संताप तीव्र शब्दात व्यक्त केला. अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री नेहा शितोळे यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.
“जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे त्याला शिक्षा तरी मानवी का असावी?” असा प्रश्न अभिनेता अभिजीत केळकरने सोशल मीडियावर पोस्ट करत विचारला तर अभिनेत्री नेहा शितोळेनेही कडक शब्दात आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. “काहीतरी भीषण, भीतीदायक आणि कायमचा धाक निर्माण करणारी शिक्षा सुनवायलाच पाहिजे…गोळ्या घालून लगेच विषय संपेल, फाशी देऊन मोकळं करू नका…तडपवून, तरसवून, हाल हाल करून मारा” अशी मागणी नेहाने सोशल मीडियावर केली. “माणूस म्हणून नक्की कुठे जात आहोत आपण?” असा प्रश्न अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने विचारला आहे.
बदलापूर प्रकरण उघडकीस आल्यावर सगळीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे. ही केस SIT सांभाळेल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात या केसची सुनावणी होईल असं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं असलं तरीही बदलापूरकरांचा राग अजून शांत झाला नाहीये. नागरिक रस्त्यावर उतरले असून सदर शाळेची तोडफोड करण्यात आली आहे तर बदलापूरमध्ये रेल रोको केल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरु आहेत.
सरकार या केसबाबात आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे. कोलकाता प्रकरण ताजे असतानाच ही घटना घडल्यामुळे बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्याच्या शिक्षेमध्ये बदल व्हावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




