“महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्र्यांनी करावे”; महेश तपासे
![Mahesh Cheghe said that the Chief Minister should protect the jobs and investments of Bhoomiputras in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/mahesh-tapase-and-eknath-shinde-780x470.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपच्या कुटील डावाला बळी पडू नका
मुंबई : महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश तपासे यांनी खरपूस समाचार घेतला.
गुजरात पाठोपाठ आता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील उद्योग व बॉलिवूड पळविण्यासाठी मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. ज्या बैठका त्यांनी घेतल्या त्यामध्ये त्यांनी उत्तरप्रदेशचे व्हिजन सांगितले. परंतु ही सर्व उत्तरप्रदेशमधून सर्वाधिक खासदार निवडून आणण्यासाठी भाजपची रणनीती आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
गुजरातची निवडणूक होती त्यावेळी महाराष्ट्रातील उद्योग पळवण्यात आले आणि गुजरातमध्ये सरकार आणले. आता ही लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातून उद्योग उत्तरप्रदेशमध्ये पाठवण्याचा डाव भाजप रचत आहे. या डावाला हाणून पाडण्याचे काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावे, असे आवाहनही महेश तपासे यांनी केले आहे.