इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्वोच्च न्यायालयात
![Maharashtra Superstition Eradication Committee in Supreme Court against Indurikar Maharaj's statement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/darshana-pawar-2-780x470.jpg)
पुणे : स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला तर मुलगी होत असते, असे अशास्त्रीय वक्तव्य करणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यावरील खटला सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात सावधानपत्र म्हणजेच कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे.
इंदुरीकर महाराजांच्या या वक्तव्यासंदर्भात त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयातील खटला सुरू ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) खंडपीठाने १६ जून रोजी देताना खटला रद्द करण्याचा जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला आहे. तसेच, इंदुरीकर महाराज यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिलेली आहे. त्यामुळे या काळात ते औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश किशोर संत यांच्या निकालाला आव्हान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – राहुलने दर्शना पवारची हत्या का केली? पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
दरम्यान, त्यापुर्वीच सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा.अंनिस) वतीने खबरदारी म्हणून सावधानपत्र (कॅव्हेट) दाखल करण्यात येणार आहे, असे समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.