वीज संपाबाबत महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालकाचे मोठे वक्तव्य
![Maharashtra State Electricity Board director's big statement regarding power strike](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Maharashtra-State-Electricity-Board-780x470.jpg)
मुंबई : खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे अधिकारी- कर्मचारी यांनी 4 ते 6 जानेवारी हे तीन दिवस संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्यभरातील सरकारी वीज क्षेत्रातील कर्मचारी ७२ तासांच्या संपावर जाणार आहेत. याचा परिणाम महावितरण आणि महानिर्मिती या कंपन्यांच्या दैनंदिन कामकाजावर होण्याची शक्यता आहे. या काळात वीजपुरवठा करण्याची जबाबदारी केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची असणार असल्याने मोबाईल चार्ज करून ठेवा, पाण्याच्या टाक्या भरून घ्या, दळण दळून ठेवा असे आवाहन महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे.
महावितरण वीज कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे तीन दिवस राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी राज्यातील जनतेला कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नसल्याचं ट्वीट करत म्हटलं आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीने महावितरणच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवान्यासाठी अर्ज केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी 30 संघटनांनी आज मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी संघर्षं समितीने म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वीज कर्मचारी संपावर राहतील. हा संप नागरिकांना त्रास होईल अशा उद्देशाने बिलकुल नाही. आम्हाला काही मिळवायचे आहे असा सुद्धा या संपा मागे उद्देश नाही. पण फ्री सिम देऊन हळूहळू बीएसएनएल कंपनी जशी गिळंकृत केली तशी सार्वजनिक उद्योग महावितरण गिळंकृत करायला कोणी येत असेल तर त्याला हा विरोध आहे.