उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्राला मे महिन्यात दिलासा; हवामान विभागाचा अंदाज
![Maharashtra relieved by Ukada in May; Meteorological Department Forecast](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/उकाड्याने-हैराण-झालेल्या-महाराष्ट्राला-मे-महिन्यात-दिलासा-हवामान-विभागाचा-अंदाज.jpg)
पुणे : मे महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या मध्य, पूर्व आणि दक्षिण भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. या महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून, रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते, असे ‘आयएमडी’च्या अंदाजात म्हटले आहे. (Pune Temperature Update)
देशाच्या बहुतांश भागांत सध्या उष्णतेच्या लाटेने कहर केला असताना येत्या काळात ही स्थिती बदलणार असल्याचे संकेत ‘आयएमडी’च्या मे महिन्याचा हवामान अंदाजातून देण्यात आले आहेत. ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मे महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला.
डॉ. महापात्रा म्हणाले, ‘गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लडाख, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत मे महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. देशात इतरत्र कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता अधिक आहे.’
‘ज्या राज्यांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, ती राज्ये सोडून देशातील इतर राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल. याचा अर्थ मे महिन्यात विजांसह होणाऱ्या वादळी पावसाचे प्रमाण यंदा जास्त असेल. मराठवाड्यासह दक्षिण भारताचा आणि जम्मू काश्मीर चा काही भाग वगळता देशात इतर भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाण्याची शक्यता आहे,’ असेही डॉ. महापात्रा यांनी सांगितले.
वायव्य भारतात उच्चांकी तापमान
मार्च महिन्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या विक्रमी तापमानानंतर एप्रिल महिन्यातही देशाच्या काही भागांत विक्रमी तापमान नोंदले गेल्याचे डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘वायव्य आणि मध्य भारतात यंदा एप्रिलमधील तापमानाचा १२२ वर्षांमधील उच्चांक नोंदला गेला, तर देशभरात एप्रिल महिना आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक उष्ण महिना ठरला. याआधी २०१०, २०१६, १९७३ मध्ये एप्रिलमधील तापमानाचे उच्चांक नोंदले गेले होते.’