breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर

सासवड देशात प्रथम; लोणावळा तिसऱ्या स्थानी

पुणे | स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२३ मध्ये महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात सासवडने देशात पहिले तर लोणावळा शहराने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुरस्कारप्राप्त नगरपरिषदा आणि महानगरपालिकांचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झालेल्या सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच. गोविंदराज यांनी स्वीकारला. पुणे जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला.

राष्ट्रीय स्तरावरील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरस्कारांपैकी तीन पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले असून यात सासवड नगरपालिका तसेच लोणावळा नगर परिषदांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील स्वच्छते संदर्भातील प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावेत यावर विशेष भर दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा स्वच्छता तसेच अन्य नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या पूर्ततेकडे विशेष लक्ष देत आहेत.

हेही वाचा   –    लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन, डेक्कन क्वीन २० मिनिटे रोखली

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांना क्रमांकांसह फाईव्ह स्टार मानांकने

याव्यतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवडमध्ये स्वच्छतेसह एसटीपी उभारणी, शहर व नदी किनारा सौंदर्यीकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकटीकरण, यंत्रणांचे आधुनिकीकरण, जलव्यवस्थापन आदी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
त्याची दखल घेत पुणे महानगरपालिकेला फाईव्ह स्टार मानांकनासह स्वच्छतेत १० वा क्रमांक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला फाईव्ह स्टार मानांकन आणि वॉटरप्लस मानांकनासह स्वच्छतेत १३ वा क्रमांक मिळाला आहे.

एक लाख पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्वच्छतेच्या मानांकन प्राप्त प्रथम १० शहरांपैकी आठ शहरे महाराष्ट्रातील असून यामध्ये सासवड, लोणावळासह अन्य शहरांचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांकडून नागरिकांचे अभिनंदन

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या या यशाबद्दल लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विशेष कामगिरी केली असून त्यामुळे राज्याच्या यशात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशात नागरिकांचे योगदान महत्वाचे आहे. या कामगिरीत सातत्य ठेवले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button