“महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती”
![“महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/Ajit-Pawar-Aditya-Thackeray-1.jpg)
मुंबई |
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज वरळी, महालक्ष्मी परिसरामध्ये पहाणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी अजित पवार हे राज्याचे पर्यावरण मंत्री आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंच्या गाडीमधून आल्याचं पहायला मिळालं. आदित्य ड्रायव्हींग करत असताना अजित पवार यांनी त्यांच्या बाजूला बसून प्रवास केला. याचसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी याचा संबंध राजकारणाशी जोडत भाजपाला टोला लगावला आहे.
- घडलं काय?
शुक्रवारी (११ फेब्रुवारी २०२२ रोजी) सकाळी आदित्य ठाकरे यांच्यासह अजित पवार पहाणी दौऱ्यावर निघाल्याचं पहायला मिळालं. वरळी, महालक्ष्मी परिसरातील विकासकामांची पाहणी करताना अजित पवार यांनी या भागांमधील झोपडपट्ट्यांची रचना, येथील समस्या आणि एकंदरित परिसराची प्रत्यक्ष पहाणी केली. विशेष म्हणजे या दौऱ्यादरम्यान अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य आदित्य ठाकरे करत होते. आदित्य ठाकरेंनी गाडीचं सारथ्य करण्याचं विशेष कारण म्हणजे अजित पवार ज्या वरळी, महालक्ष्मी परिसराची पहाणी करण्यासाठी आलेले तो, आदित्य ठाकरेंचा त्यांचा मतदारसंघ आहे.
- संजय राऊत काय म्हणाले?
याचसंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग शिवसेनेच्याच हाती असल्याचं म्हटलंय. विरोधकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करुन महाविकास आघाडीला तडा जात नाही त्यामुळे भाजपाच्या पोटात कळ येत असल्याचा टोला राऊत यांनी लगावला. “महाविकास आघाडी सरकारचं स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे,” असंही राऊत म्हणाले. यापूर्वी अनेकदा भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकाची रिक्षा असा करण्यात आलाय. त्याचप्रमाणे याआधी अनेकदा या सरकारमधील नेतृत्व नक्की कोणत्या पक्षाकडे आहे असा प्रश्न उपस्थित करुन भाजपाने टीका केल्याचं पहायला मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आजच्या या पहाणी दौऱ्याचा संदर्भ देत ठाकरेंच सरकारचं नेतृत्व करत असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय.
- आदित्य ठाकरे आज गोव्यात…
आज आदित्य ठाकरे गोव्यात येणार आहेत. भविष्यात आम्ही गोव्यामधील लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही लढवणार आहोत, असं राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय.गोव्यात प्रत्येक मतदारसंघाचे प्रश्न वेगवेगळेत. त्यामुळे वेगवेगळे जाहीनाम्यांची घोषणा केली जातेय, असंही राऊत म्हणाले. शिवसेनेचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार असून तो आदित्य ठाकरेंच्या उपस्थित होईल अशी माहिती राऊत यांनी दिली.