#Lockdown: ठरलं! तीन मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंदच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Alcohol-drinking.jpg)
मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार आहेत. जिल्हाधाकिरी राजीव निवतकर यांनी यासंबंधी स्पष्ट माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं योग्य पालन केलं तर मद्यविक्रीची दुकानं सुरु केली जाऊ शकतात असे संकेत दिले होते. मात्र जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी परिपत्रक काढत ३० एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आलेला मद्यविक्रीचा आदेश ३ मे पर्यंत लागू असणार असल्याचं सांगितलं आहे.
जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे की, “करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गर्दीच्या ठिकाणी जाणे, वास्तव्य करणे इत्यादी बाबी टाळणं आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री ३० एप्रिल २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला होता”. मात्र लॉकडाउनचा कालावाधी वाढवण्यात आला असल्याने मद्यविक्री ३ मे २०२० पर्यंत पूर्ण दिवस बंद राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीवर कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.