#Lockdown: टाळेबंदी वाढण्याची चिन्हे, मुख्यमंत्र्यांचे संकेत
करोनाचे संकट दूर करण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेत आता मेअखेपर्यंत काळजी घेऊन आपणास या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू द्यायचा नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळेबंदी राज्यात आणखी लांबण्याचे सूतोवाच केले. एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरचित्रसंवादाद्वारे घेतली. करोनाविरोधी लढय़ात आम्ही राज्य सरकारसोबत आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वाना विश्वासात घेतल्याबद्दल विरोधी पक्षांच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पीककर्ज मिळावे म्हणून रिझव्र्ह बँकेशी बोलणे सुरू आहे. बियाणे व खरीप हंगाम व्यवस्थित मार्गी लावावा म्हणून चांगले नियोजन केले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पालघर लाल क्षेत्रात आहे. पण याठिकाणी आदिवासी भागही आहे. त्यांचे हाल होत आहेत. सकाळ, संध्याकाळ अशारीतीने उपनगरी रेल्वेसेवा काही प्रमाणात तरी सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी के ली. तर रिक्षा, हातगाडय़ा घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. ते पुनर्गठित करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.