फडणवीसांप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही गृहखातं हाती घ्यावं, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा लाखमोलाचा सल्ला
![Like Fadnavis, Uddhav Thackeray should also take over Home Department, senior Shiv Sena leader's advice worth lakhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/BJP-SHIVSENA1.png)
औरंगाबाद |
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असा सल्ला ज्येष्ठ शिवसेना नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant khaire) यांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपद स्वत:कडे ठेवलं होतं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनी देखील गृहखातं स्वत:कडे घ्यावं, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहखात्याच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागलेला असताना तसंच फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतरही गृहमंत्री वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आक्रमक पद्धतीने पावलं न उचलता ‘आस्ते कदम’ भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडील गृहखाते आपल्याकडे घ्यावे, असा मतप्रवाह निर्माण झाला. त्याचाच परिपाक म्हणून औरंगाबादचे माजी सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी उघड उघड भूमिका मांडली आहे.
- चंद्रकांत खैरे यांचा मुख्यमंत्र्यांना लाखमोलाचा सल्ला
चंद्रकांत खैरे म्हणाले, “मागच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच मुख्यमंत्रिपदाचा चार्ज होता. मला उद्धवजींना सांगायचंय की, आताही राष्ट्रवादीकडे असलेले गृहखाते तुम्ही आपल्या ताब्यात घ्या. म्हणजे मुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद स्वत: तुमच्याकडे असल्यावर राज्याला योग्य दिशा मिळेल”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील तत्परतेने कारवाई करत नाहीत किंबहुना भाजपविरोधात वळसे पाटील आक्रमक भूमिका घेत नाहीत. यामुळे शिवसेना नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीची अस्वस्थता आहे. आता भाजपला जशास तसे उत्तर देण्यासाठी गृहमंत्रालय आपल्याकडे घ्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
- वळसे-पाटील ‘वर्षा’ बंगल्यातून बाहेर पडताच मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री गृहखात्याच्या कारभारावर नाराजी असल्याची चर्चा असताना शुक्रवारी दुपारी मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची बैठक पार पडली. साधारण तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील वर्षा बंगल्यावरून बाहेर पडल्यावर अवघ्या काही क्षणांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून एक संदेश प्रसिद्ध करण्यात आला. गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज अशा बातम्या काही माध्यमांवर येत आहेत. या बातम्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंडन केले आहे. अशा बातम्या चुकीच्या आणि विपर्यास्त करणाऱ्या असून माझा माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे,आणि ते उत्तम काम करीत आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केल्याचे जनसंपर्क खात्याने म्हटले आहे. त्यामुळे गृहमंत्रालयाच्या कारभारावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूस तुर्तास थांबण्याची शक्यता आहे.