निवडणूक लागू द्या, हिसका दाखवतो; राम सातपुतेंचे मोहिते पाटलांना चॅलेंज

सोलापुर : भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी पुन्हा एका रणजितसिंह मोहिते पाटलांना आव्हान दिल्याने माळशिरस तालुक्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका रिंगवर माझा फोन उचलतात. आता कोणत्याही निवडणूका लागू द्या, तुम्हाला हिसकाच दाखवतो, असे खुले आव्हान राम सातपुते यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना दिले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मोहिते पाटलांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी राम सातपुते केवळ 2 हजार मतांच्या फरकाने निवडून आले होते. मात्र,2024 साली झालेल्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि उत्तम जानकर हे कट्टर विरोधक एकत्र आलेले पाहायला मिळाले. मात्र, मोहिते पाटील आणि जानकर एकत्र येऊन देखील त्यांना केवळ 10 हजार मतांनी विजय मिळाला होता. 2024 च्या लोकसभेच्या वेळेस देखील राम सातपुते यांना भाजपने सोलापूरमधून उमेदवारी दिली होती. त्यावेळी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांचा पराभव केला होता.
हेही वाचा – “राज्यसभेत जाण्यासाठी शरण…”, रोहित पवारांच्या टीकेवर अशोक चव्हाणांचा पलटवार; म्हणाले, “त्यांचं जितकं वय…”
दरम्यान, राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना चॅलेंज केले होते. एका कार्यक्रमात बोलताना सातपुते म्हणाले की, मी कार्यकर्ता आहे. एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. एवढं भाग्य मला मिळालं आहे, कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणतीही निवडणूक लागू द्या. तुम्ही मैदानात या. तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आता मोहिते पाटील राम सातपुतेंना काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.