breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ताडोबामध्ये भरधाव कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

ताडोबा |

अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली-पद्मापूर मार्गावर कक्ष क्रमांक १८४ मध्ये एका भरधाव कारच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना काल (बुधवार) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे वनविभागात खळबळ उडाली असून ताडोबा प्रकल्पातील वन्यजीवांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक १८४ मध्ये वनविभागाचे क्षेत्र सहायक देऊळकर हे कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असतांना त्यांना पूर्ण वाढ झालेला पाच ते सहा वर्षांचा नर बिबट मृतावस्थेत आढळून आला. तर, बिबट्या मृतावस्थेत आढळून आलेल्या ठिकाणापासून २५० मीटर अंतरावर एका चारचाकी वाहनाचा अपघात झाल्याचेही आढळून आले. अपघातग्रस्त वाहनाची तपासणी केली असता, हे वाहन बल्लारपूर येथील व्यक्तीचे असल्याचे आढळून आले.

वाहनाच्या समोरील चाकांवर आणि बोनेटवर बिबट्याचे केस देखील आढळून आले. तर, वाहनचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात वाहनातील सर्व जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्थानिक खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच, क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, बफरचे उपसंचालक जी. गुरूप्रसाद यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. डॉ. कडूकर, डॉ. खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांच्या उपस्थित बिबट्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले. या अपघातामुळे ताडोबा प्रकल्पातील वन्यजीवाचा सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. ताडोबा मार्गावर वन्यजीवांची मोठी वर्दळ, मद्यधुंद पर्यटकांच्या वाहनांचा अतिवेग वनविभागासाठी चिंतेची बाब ठरत आहे. या प्रकरणाचा अधिका तपास करण्यात येत असून वाहनचालकाचा जबाब नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई सहायक वनसंरक्षक येडे, वनपरीक्षेत्राधिकारी आर.जी.मुन, क्षेत्र सहायक देऊळकर, गजपुरे यांनी केली.

वाचा- ‘पुढील दोन आठवड्यात दिवसाला १००० जणांचा मृत्यू होणार’; महाराष्ट्राभोवतीचा करोनाचा फास घट्ट होण्याची भीती

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button