लातूरकरांनी मांजरा नदीकाठावर तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वृक्ष लागवड करत देशापुढे एक आदर्श निर्माण …
![Laturkar created a role model for the country by planting trees up to ten kilometers on the banks of Manjra river.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Laturkar-created-a-role-model-for-the-country-by-planting-trees-up-to-ten-kilometers-on-the-banks-of-Manjra-river..jpg)
लातूर | लातूरकरांनी मांजरा नदीकाठावर तब्बल दहा किलोमीटरपर्यंत वृक्ष लागवड करत देशापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा प्रशासनाकडून व नागरिकांच्या सहभागातून मांजरा नदीकाठावर दहा किलोमीटरपर्यत वृक्ष लागवड करण्यात आली. भातखेड येथे वृक्ष लागवडीचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी आणि जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते वृक्षरोपण करून औपचारिक उदघाटन करण्यात आले. ‘जेथे झाडे रुजवली जातात, तिथे झाडे जगवली जातात’, ‘वाढती पर्जन्यवृष्टी, वृक्षांनी सजवा सृष्टी’, ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषवाक्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत वृक्षदिंडीही काढली.
वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज आहे, हाही नागरिकांना प्रत्यय आलेला आहे, वृक्ष लागावडीसाठी प्रयत्न केल्यापेक्षा जास्तीचा नागरिकांमधून सहभाग मिळत आहे, याचं श्रेय नागरिकांचेच आहे, लोकांनी या गोष्टीला स्वीकारले आहे. लातूर जिल्ह्यात वृक्ष लागवड करणे अनिवार्य असणार आहे असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. म्हणाले की, देशात लातूर जिल्हा कमी पर्जन्यमान असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशातच नव्हे, तर राज्यात लातूरचे ०.६ टक्के वनाच्छादित आहे. वनाचं क्षेत्र सरासरी ३३ टक्के इतके असणे आवश्यक आहे. लातूरचा इतिहास असा आहे की, लातूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. जिल्हा प्रशासन, नागरिक, संस्था, ग्रामपंचायत तसेच शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने याही वर्षी लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज समजून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वृक्ष लागवडीची प्रक्रिया सातत्याने अविरत आपल्याला जबाबदारी समजून सुरु ठेवावी लागणार आहे. जिल्ह्यातील नागरिकही याबाबतीमध्ये जागरुक आहेत. या वृक्ष लागवडीसाठी नागरिकांतून सहभाग प्रोत्साहन मिळत आहे, ही छोटी चळवळ असून अविरतपणे सुरु ठेवणार आहोत.
दरम्यान, लातूर तालुक्यातील भटखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या चौदा गावात वृक्ष लागवड करण्यात आली.
सेल्फी पॉईंट ठरला आकर्षण
‘सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी, १० किलोमीटरची मानवी साखळी, २८ हजार वृक्षाची लागवड. या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार’, असा सेल्फी पॉईंट ग्रीन वृक्ष टीमने केला होता. ते सेल्फी पॉईंट मध्ये स्वतः जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोटो काढला. नंतर अनेक लोकांनी फोटो काढून घेऊन आपल्या डीपी ला लावला.
वृक्ष लागवड पुढील प्रमाणे झाली
लातूर तालुक्यातील भातखेडा येथे २ हजार रोपे, सोनवती येथे २ हजार रोपे, धनेगाव येथे ४ हजार रोपे, शिवणी खुर्द येथे ५५० रोपे, भातांगळी येथे ३ हजार ५००, भाडगाव येथे १ हजार, रमजानपूर येथे १ हजार ५००, उमरगा येथे २ हजार, बोकनगाव येथे २ हजार ३००, सलगरा बुद्रुक ४ हजार १००, बिंदगीहाळ ५००, औसा तालुक्यातील शिवणी बुद्रुक ३ हजार, तोंडवळी येथे २ हजार, होळी येथे २ हजार असे गावनिहाय वृक्ष लागवड करण्यात आली.