अखेर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू! आठवड्यातून ३ दिवस प्रवासाची सोय
![Kolhapur-Mumbai flight finally launched! Travel 3 days a week](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Flight.jpeg)
कोल्हापूर | प्रतिनिधी
टू जेट कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे खंडित असलेली मुंबई ते कोल्हापूर विमानसेवा अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा आठवड्यातून आता सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी तीन दिवस सुरू राहणार आहे. तसेच ‘मुंबई-कोल्हापूर-मुंबई विमानसेवा दररोज सुरू करण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न असून फेब्रुवारीपर्यंत ही सेवा दररोज सुरू होईल’, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. शिवाय लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावर कार्गो सेवा सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
काल कोल्हापुरातून मुंबईसाठी १३ प्रवासी रवाना झाले. सततच्या खंडित होणाऱ्या विमानसेवेमुळे प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. गेल्या अडीच महिन्यांपासून विमानसेवा टू जेट कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे बंद होती. किमान यापुढे विमानसेवा नियमित सुरू व्हावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. मुंबई विमानसेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून एक जानेवारीपासून आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र निम्मा महिना उलटूनही विमानसेवा पूर्ववत न झाल्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते, अशातच पूर्वीप्रमाणेच आठवड्यातील तीनच दिवस विमानसेवा सुरू झाल्यामुळे आठवड्यातील सातही दिवस विमानसेवा कधी सुरू होणार, अशी विचारणा प्रवाशांकडून करण्यात येत आहे. या विमानसेवेच्या नव्या वेळापत्रकानुसार, मुंबईहून सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी कोल्हापूरसाठी उड्डाण व १२ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापुरात लँडिंग, कोल्हापूरहून मुंबईसाठी १ वाजून १५ मिनिटांनी उड्डाण, तर दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी मुंबईत लँडिंग असे आठवड्यातील तीन दिवस नियमित विमानसेवा सुरू राहणार असल्याची माहिती कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी दिली.