जावयाने सासऱ्याला कालव्यात ढकललं, मृतदेह पाण्यातून बाहेर काढताना लहान भावाचाही मृत्यू
![Javaya pushes father-in-law into canal, younger brother dies while pulling body out of water](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Javaya-pushes-father-in-law-into-canal-younger-brother-dies-while-pulling-body-out-of-water.png)
भंडारा|भंडारा जिल्ह्यात आज एक विचित्र घटना घडली आहे. येथे एका जावयाने आपल्या सासऱ्याला कालव्यात ढकलून दिलं. या घटनेत सासऱ्याचा मृत्यू झाला. जेव्हा त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांचा लहान भाऊ कालव्यात उतरला तेव्हा त्याचाही बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सिंधी येथे घडलीये.
हरी गोविंदा नागपुरे (65) आणि चंद्रभान गोविंदा नागपुरे (55) या दोन भावंडांचा उजव्या कालव्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपी जावई अनिल नारायण हटवार (वय 40) याला पवनी पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
मोठा भाऊ हरी याला त्याच्या जावयाने कालव्यात ढकलले. त्यामुळे खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ चंद्रभान याने त्यांचे प्रेत बाहेर काढतो, असं सांगत त्यांनी सोमवारी सकाळी कालव्यात उडी घेतली. मात्र, पाणी जास्त असल्याने त्यांचाही कालव्यात बुडून मृत्यू झाला.
पोलिसांनी दोन्ही प्रेत कालव्यातून बाहेर काढले. विशेष म्हणजे आरोपी जावायाने सासऱ्याला कालव्यात का फेकले याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आरोपी अनिल नारायण हटवार याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे.